भुयारी गटार योजनेची फेज-2 होणार? ; काम रखडल्याने महासभेत नगरसेवक संतप्त, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे सूतोवाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुयारी गटार योजनेची फेज-2 होणार? ; काम रखडल्याने महासभेत नगरसेवक संतप्त, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे सूतोवाच

महापालिकेची फेज-2 पाणी योजना मागील 11 वर्षांपासून प्रलंबित आहे व आता नव्याने सुरू असलेली भुयारी गटार योजनाही याच दिशेने वाटचाल करू लागली आहे, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत व्यक्त केली.

मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय
तलाठ्याच्या वाहनाल ट्रँक्टरची धडक
कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी- महापालिकेची फेज-2 पाणी योजना मागील 11 वर्षांपासून प्रलंबित आहे व आता नव्याने सुरू असलेली भुयारी गटार योजनाही याच दिशेने वाटचाल करू लागली आहे, अशी भीती सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत व्यक्त केली. महापालिकेद्वारे राबवण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम ठेकेदार करीत नाही, तो महापालिकेत फक्त बिले काढण्यासाठीच येतो, त्यामुळे ही योजनाही फेज-2 सारखी रखडणार आहे, असा दावा मनपा महासभेत शुक्रवारी झाला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने व त्या योजनेसाठी फोडून ठेवलेले रस्तेही दुरुस्त करता येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मनपा आयुक्त शंकर गोरे यांनीही हा विषय गांभीर्याने घेत, संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे सूतोवाच केले. 

    महापालिकेची सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. महापौर वाकळे यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा होती. त्यामुळे वाकळेंनी मागील अडीच वर्षात केलेल्या कामांचा कौतुक सोहळाही यानिमित्ताने रंगला. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसेवक व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. नगर शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, मोठे खड्डे पडलेले आहेत, शहरांमध्ये अमृत योजनेची भुयारी गटार योजना कोट्यवधी रुपयांची केली खरी, मात्र ती अजून पूर्णत्वाला गेली नाही, या योजनेसाठी रस्ते खोदून ठेवले आहे, योजना पूर्ण होत नसल्याने ते दुरुस्त करता येत नाही, खड्ड्यांमुळे नागरिकांची नाराजी नगरसेवकांना सहन करावी लागते, या योजनेचा सगळा खेळखंडोबा झाला आहे असा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक दत्ता कावरे व राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी सभागृहामध्ये केला. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेत महापौर वाकळे यांनी, या योजनेशी संबंधित ठेकेदारांची कामे तपासा आणि मगच त्यांना बिल अदा करा, असे आदेश आयुक्तांना दिले. जर तो ठेकेदार काम व्यवस्थित करणार नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका व काम थांबवा, दुसरा ठेकेदार नेमा, असेही त्यांनी यावेळी प्रशासनाला सुचवले. अमृत योजनेच्या संदर्भात एक काम व्यवस्थित होत नाही. पण ठेकेदार इथे बिल काढण्यासाठी फक्त येतो, ही बाब अतिशय गंभीर आहे असे ते म्हणाले. हरित लवादाने त्यांचे काम योग्य नसल्यामुळे महापालिकेला दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची बिले देऊ नका, असे वाकळे यांनी सांगितले. यावेळी भागानगरे यांनी अमृत भुयारी गटार योजनेचे संदर्भामध्ये एखाद्या अधिकार्‍यावर जबाबदारी निश्‍चित करावी, अशी मागणी केली. तर नगरसेवक घुले यांनी, तो ठेकेदार साधे चेंबरवरचे झाकणे देऊ शकत नाही. आम्ही आमचे पैसे यासाठी त्याला दिले आहे व त्या ठेकेदाराचा आपल्याला काय उपयोग, असा सवाल केला.

    त्यानंतर या संदर्भामध्ये बोलताना आयुक्त गोरे म्हणाले की, या संदर्भामध्ये नगरसेवकांच्या व नागरिकांच्या सुद्धा अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अमृत योजनेच्या संदर्भात मी सुद्धा तपासणी केलेली आहे. आता त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांनी काम पूर्णत्वाला गेले की नाही, याबाबत पत्र दिले तरच त्याला आता पेमेंट केले जाईल, असा निर्णय मी घेतलेला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. जर संबंधितांनी योग्य पद्धतीने काम केले नाही तर त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. यावेळी महापौर वाकळे यांनी, अभियंता रोहिदास सातपुते यांनीही ही बाब गांभीर्याने घ्यावी. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी दिला.

खड्ड्यांचा विषय गाजला

नगरमध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे, खड्डे बुजवले जात नाही, असा आरोप नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी केला. तर श्याम नळकांडे यांनी नगर-कल्याण रोड परिसरामध्ये अमित कॉलनी व इतर कॉलनीमध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही. खड्ड्यामध्ये साचलेले पाणी महामार्गावर येत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे, असा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भामध्ये शहर अभियंता सुरेश इथापे यांनी आम्हाला बजेट मंजूर करायला उशीर लागला, तसेच निविदा सुद्धा लवकर काढता आली नाही व त्याची प्रक्रिया आता सुरू आहे. लवकरात लवकर आम्ही खड्डे बुजवण्याचे काम नगर शहरामध्ये पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले.

त्यांना मिळते, मग मला का नाही?

शिवसेनेचे नगरसेवक दत्ता कावरे यांनी आमच्या प्रभागांमध्ये आम्हाला साधी लाईट फिटिंग दिली जात नाही. मात्र, याच प्रभागांमध्ये अन्य दोन नगरसेवकांना फिटिंग दिले जाते, ही वशिलेबाजी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावरून सभागृहांमध्ये चांगलाच वादंग झाला. विद्युत विभाग प्रमुख राजेंद्र मेहेत्रे यांना त्यांनी जाब विचारला. त्यांचे उत्तर व्यवस्थित न आल्यामुळे नगरसेवकांबाबत तुम्ही जर अशा पद्धतीने कारभार करणार असाल तर वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, महापौर वाकळेंनी त्या दोन नगरसेवकांची नावे सांगण्याचे आदेश अभियंता मेहेंत्रेंना दिले व त्यावर स्थायी समितीचे राष्ट्रवादीचे सभापती अविनाश घुले यांनी राजकीय टोमणा मारला. माळीवाड्यातील कावरेंच्या प्रभागातील सेनेचेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांना लाईट फिटींग मिळाल्या आहेत, पण कावरेंना मिळाल्या नाहीत. त्यामुळे कावरे नाराज झाले आहेत, त्यांचे समाधान करा, असे भाष्य त्यांनी करताच हशा पिकला.

लसीकरणाचा जाब विचारतात

विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून सर्वसामान्यांना लसीकरण मिळत नाही, असा दावा केला. आपलं (नगरसेवक) काम योग्य नाही, नागरिक त्रस्त झाले आहे, आपल्या आरोग्य विभागाच्या सगळा सावळा गोंधळ आहे. आपण लसीकरण करणार नसेल तर काय उपयोग? लोक जाब विचारतात. यावर आपण तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर महापौर यांनी प्रशासनासमवेत याबाबत एकत्रित बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ असे ते सांगितले.

COMMENTS