जिल्हा परिषद सदस्य राऊत यांनी संकलित केली माहितीअहमदनगर/प्रतिनिधी-टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा हरियाणाचा अॅथ
जिल्हा परिषद सदस्य राऊत यांनी संकलित केली माहिती
अहमदनगर/प्रतिनिधी-टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा हरियाणाचा अॅथलेटिक्स नीरज चोप्रा हा मूळचा महाराष्ट्रीयन आहे. नगरच्या जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे सदस्य सीताराम राऊत यांनी त्याची माहिती संकलित केली असून, पानिपत युद्धाच्यावेळी हरियाणात गेलेल्या मराठी लढवय्या कुटुंबातील तो असून, तेथे स्थायिक झाल्यानंतर रोड मराठा समाज म्हणून त्यांना ओळखले जाते व याच समाजाचा नीरज असल्याने त्याचे सुवर्णपदक मूळचा मराठी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे, अशी भावनाही राऊत यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गटाचे जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करणारे राऊत यांना फिरण्याची आवड आहे. 15-20 वर्षांपूर्वी ते दिल्ली व हरियाणा परिसरात फिरायला गेले असताना तेथील रोड मराठा समाज हा मूळचा महाराष्ट्रीयन असल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, 1761मध्ये सदाशिवरावभाऊ यांच्यासमवेत पानिपतमध्ये अब्दालीशी लढलेल्या लढवय्यांमध्ये अनेक मराठी योद्धे होते. काही त्यावेळी कुटुंबासह या युद्धावर गेले होते. दुर्दैवाने युद्धात पराभूत झाल्याने अनेकजण तेथेच स्थायिक झाले. रोडच्या कडेला राहू लागल्याने रोड मराठा असा समाजही त्यांचा निर्माण झाला व याच समाजाचे प्रतिनिधीत्व नीरज चोप्राही करतो. त्यामुळे त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत मिळवलेले सुवर्णपदक जसे हरियाणाला अभिमानास्पद आहे, तसे ते महाराष्ट्रालाही आहे. त्यामुळे नगरच्या जिल्हा परिषदेत त्याच्या अभिनंदनाचा व कौतुकाचा ठराव करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
तेही करतात पुरणपोळी..
जिल्हा परिषद सदस्य राऊत यांनी नीरज चोप्राच्या महाराष्ट्रीयन असण्याबाबत सोशल मिडियातून भाष्यही केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, नीरज चोप्रा या महान खेळाडूचे महाराष्ट्राशी नाते काही वेगळे आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे पानिपत झाले, परंतु वाचले ते मराठे पानिपत आणि आजूबाजूच्या परिसरात स्थायिक झाले. त्या ठिकाणी त्या समाजाचे आज रोड मराठा असे नाव आहे. नीरज चोप्रा हा या रोड मराठा समाजातील युवक आहे. महाराष्ट्राशी अत्यंत आगळेवेगळे नाते या समाजाचे अशाप्रकारे आहे. आजही त्या ठिकाणी हा समाज सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करतो तसेच एखाद्या उत्सवाचा भंडारा करताना त्यात पुरणपोळी हे त्यांचे मुख्य पक्वान्न असते. त्यांच्या बोली भाषेतही अनेक मराठी शब्द आहेत. मराठी असल्याची एक वेगळीच जवळीक या समाजात आहे. सर्व देशाला आज नीरज चोप्राचा अभिमान आहे, आपल्यालाही आहे व महाराष्ट्राशी त्याचे असलेले नातेही आपण अभिमानाने सांगावे असे आहे, असेही राऊत यांनी या भाष्यात म्हटले आहे.
COMMENTS