भाजप पदाधिकार्‍यांवर शिवसैनिकांचा हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप पदाधिकार्‍यांवर शिवसैनिकांचा हल्ला

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकार्‍यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

अपघातात कार चालक गंभीर जखमी
भाजपच्या फटकार मोर्चाला शिवसेनेचा ’फटकार’!
मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक

बुलडाणा/प्रतिनिधीः शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकार्‍यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकार्‍यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसैनिकांचा आरोप आहे, की भाजपचे नेते आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. विजयराज शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटांना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोडे, विजया  राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. शिवसेनेचे श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसेच अनेक जण सहभागी होते. 

शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपला पळती भुई थोड़ी झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे, तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. सध्या भाजप नेते आणि कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यासमोर गोळा झाले होते.  आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोना विषाणु कोंबायचे विधान केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपने गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचे ठरविले होते; परंतु शिवसैनिकांनी भाजपचा प्लॅन फेल केला.

COMMENTS