नांदेड / हिंगोली गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात काढणीस आलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात न
नांदेड / हिंगोली
गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात काढणीस आलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी दि. २८ रोजी भर पावसात हदगाव तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी थेट व्हिडीओ कॉल व्दारे संवाद साधून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या सर्व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिके, सोयाबीन, कापूस, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणच्या शेतजमिनी खरडून गेल्या तर नदी-नाल्यांनाही मोठ्या प्रमाणावर पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले. खासदार हेमंत पाटील यांनी आज हदगाव तालुक्यातील करमोडी, उंचाडा,पळसा, पिंपरखेडा यासह अनेक गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सततच्या नुकसानीने हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांनी पिकांचे नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी बिजेपी तालुका प्रमुख तुकाराम चव्हाण,करमुडी सरपंच अनिल पोवार,पिंपरखेडा सरपंच नागोराव वाकोडे,पळसा शिवसेना सर्कल प्रमुख शंकर कदम, बालाजी चव्हाण, सरपंच रणजित कांबळे, शंकर मस्के, अविनाश मस्के, तुकाराम साखरे, बालाजी साखरे, ओमप्रकाश येवले, मनोज भाले, करमोडी शाखाप्रमुख विरभद्र आमदरे, गौरव पंचलिंगे, रामचंद्र आनेराव, महारुद्र आनेराव, शुभम पंचलिंगे, संतोष धरमुरे, शिव शंकर आनेराव, गंगाधर आनेराव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
खासदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात यापूर्वीच देशाचे केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नाचा शासन व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी बांधव वंचित राहणार नाही असे खासदार हेमंत पाटील यांनी या वेळी शेतकऱ्यांना सांगितले.
COMMENTS