बोठेला नगरच्या कारागृहात ठेवा  ; जरे व अ‍ॅड. पटेकर यांची मागणी, मोबाईल वापराचाही व्यक्त केला संशय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेला नगरच्या कारागृहात ठेवा ; जरे व अ‍ॅड. पटेकर यांची मागणी, मोबाईल वापराचाही व्यक्त केला संशय

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज.

करंजीत सुरू होणार घरोघरी आरोग्य तपासणी- उपसरपंच आगवन
आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू…
बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला पारनेर पोलिसांच्या दुय्यम कोठडीत ठेवण्याऐवजी नगरच्या कारागृहात ठेवावे, अशी मागणी रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे व त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. दरम्यान, पारनेरच्या कोठडीतील आरोपींकडे सापडलेले मोबाईल बोठेही वापरत असावा, असा संशयही जरे व अ‍ॅड. पटेकर यांनी या पत्रात व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे. 

    याबाबतची माहिती अशी की, रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बोठे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने सध्या तो पारनेर पोलिसांच्या दुय्यम कारागृहात आहे. मागील आठवड्यात नगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पारनेरच्या तहसीलदार ज्योती कावरे यांनी पारनेर दुय्यम कारागृहाची मध्यरात्री अचानक झडती घेतली. त्यावेळी तेथील एका बराकीतील दोन आरोपींकडे दोन मोबाईल सापडले. हे दोन आरोपी ठेवलेल्या बराकीत एकूण 10 आरोपी होते व त्यात बोठेचाही समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर रेखा जरे यांचा चिरंजीव रुणाल जरे व त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांना पत्र देऊन बोठेला पारनेर पोलिसांच्या कारागृहात ठेवण्याऐवजी नगरच्या कारागृहात ठेवण्याची मागणी केली आहे.

मोबाईल वापराचा संशय

जरे व अ‍ॅड. पटेकर यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात बोठे याची पारनेर येथील दुय्यम कारागृहातून नगर येथील कारागृहात रवानगी करण्याची मागणी केली आहे. पारजेर येथील पोलिस ठाण्याच्या दुय्यम कारागृहातील आरोपींकडे दोन मोबाईल फोन अंगझडतीस सापडले आहे. हे दोन्ही फोन कोठडीतील बाथरूममधील पाणी बाहेर जाण्याच्या पाईपमध्ये लपवून ठेवले जात होते, असे चौकशीत समोर आले आहे. त्याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे समजले. या कारागृहात रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे त्याच ठिकाणी असल्याची माहिती समजली आहे. बोठे याला जरे हत्याकांडासह खंडणीच्या व विनयभंगाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मोबाईल सापडले, त्याच ठिकाणी बोठेही होता व त्या मोबाईलचा वापर बोठेनेही केला असल्याचा संशय आम्हाला आहे, असे स्पष्ट करून जरे व अ‍ॅड. पटेकर यांनी पुढे म्हटले आहे की, त्यामुळे हा फोन जर बोठेने वापरला असेल तर त्याने अजून कोणते नियोजन तर केले नसावे? तो फोन त्याने कोणाकोणाला फोन करण्यासाठी वापरला असेल? साप हा बंद पेटीमध्ये कितीही वळवळला तरी त्याचा फणा ठेचलाच पाहिजे, नाहीतर तो किती घातक असू शकतो, याची कल्पना करू शकत नाही. यात अजून कोणाकोणाचा जीवदेखील जाऊ शकतो, हे सत्य देखील नाकारता येत नाही, अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे.जरे हत्याकांडातील आरोपी बाळ ज. बोठे याने गुन्ह्यात वापरलेला आयफोन हा त्याच्या घरातून जप्त केलेला आहे. हा आयफोन पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. त्याचा अहवाल अद्यापपावेतो येणे बाकी आहे, तोच दुसर्‍या मोबाईलचा विषय झाला आहे, असे नमूद करून जरे व अ‍ॅड. पटेकर यांनी पुढे म्हटले आहे की, जरे हत्याकांड गुन्ह्याचे स्वरुप खूप मोठे असताना आरोपी बाळ ज बोठे हा मोबाईल वापरत असेल तर असे म्हणणे बरोबर असणार की, या गुन्ह्याबाबत त्याच्या मनात कोणतीही भीती नाही आणि त्यामुळे अजूनही बाळ बोेठे या आरोपीस पारनेर येथील दुय्यम कारागृहात ठेवणे किती घातक ठरू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे या अट्टल गुन्हेगारास नगरच्या कारागृहात हलवणे योग्य राहणार आहे. नाही तर यात अजून असंख्य जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना व्यक्त करून पुढे म्हटले आहे की, अट्टल गुन्हेगार बाळ ज. बोठे याला लवकरात लवकर नगर येथील कारागृहात ठेवण्यात यावे, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवली प्रत

रुणाल जरे व अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेरच्या दुय्यम कारागृहातून नगरच्या कारागृहात हलवण्याची मागणी करणार्‍या पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहमंत्री तसेच पोलिस महासंचालक व राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांसह पारनेर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनाही पाठवली आहे.

COMMENTS