बिलाच्या कारणावरून डॉक्टरांनी केली रुग्णाच्या नातेवाईकास मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिलाच्या कारणावरून डॉक्टरांनी केली रुग्णाच्या नातेवाईकास मारहाण

हॉस्पिटलमधील रुग्णाच्या वैद्यकीय उपचाराचे पक्के बिल मागितल्याचा राग येवून डॉक्टरांसह हॉस्पिटलमध्ये स्टाफने शिवीगाळ व दमदाटी करीत प्रशांत जाधव यांना लोखंडी गजाने मारहाण केली.

बैलाने मारल्याने ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू
बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…

अहमदनगर/प्रतिनिधी-हॉस्पिटलमधील रुग्णाच्या वैद्यकीय उपचाराचे पक्के बिल मागितल्याचा राग येवून डॉक्टरांसह हॉस्पिटलमध्ये स्टाफने शिवीगाळ व दमदाटी करीत प्रशांत जाधव यांना लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना नगर-पुणे रोडवरील पॅसिफिक सेंटर (स्वस्तिक चौक) येथे घडली. 

    याबाबतची अधिक माहिती अशी की, जामखेड नगरपरिषदेतील लिपिक आकाश भागवत डोके (वय 26, राहणार भुतवडा, जामखेड) यांचे मेहुणे भागवत सुपेकर यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचारासाठी स्वस्तिक चौकातील पॅसिफिक सेंटरमध्ये बुधवारी (दिनांक 5) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना शनिवारी  (दिनांक 8) आकाश डोके हे सुपेकर यांना जेवणाचा डबा व औषधे घेऊन कोव्हिड सेंटरमध्ये देण्यासाठी गेले असताना सुपेकर यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या बेडसमोरच्या बेडवर व डाव्या बाजूच्या बेडवर मृतदेह (डेड बॉडी) ठेवलेले आहेत. डॉक्टरांना सांगून ते दुसरीकडे ठेवण्यास सांगा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डोके यांनी डॉक्टर प्रशांत जाधव यांना फोन करून सुपेकर यांच्या बेडजवळ असलेले मृतदेह दुसरीकडे हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून दोन्ही मृतदेह सुपेकर यांच्या बेडपासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर सोमवारी (दिनांक 10) रात्री दोन वाजता सेंटरमधून फोन करून डोके यांना कळविले की, तुमचे पेशंट भागवत सुपेकर हे मयत झाले. डॉक्टरचा निरोप मिळाल्यानंतर डोके व त्यांचे मामा संजय किसन जाधव यांनी जामखेडहून अ‍ॅम्बुलन्स घेऊन सकाळी आठ वाजता पॅसिफिक कोव्हीड सेंटरला ते आले. त्यांनी डॉक्टरांकडे मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यावर हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉ. पाटील यांनी तुम्ही हॉस्पिटलचे दोन लाख 65 हजार रुपये भरा, नंतर बॉडी ताब्यात घ्या, असे म्हटले आणि डॉ. पाटील यांनी त्यांच्या हातात दोन लाख 65 हजार रुपयांचे कच्चे बिल दिले. त्यावर आकाश डोके यांनी पक्क्या बिलाची मागणी केली. याचा राग येऊन तिथे उपस्थित असलेले कृष्णराज पाटील व बाळकृष्ण पाटील यांनी डोके व त्यांचे मामा संजय जाधव यांना शिवीगाळ करीत मारहाण केली आणि हॉस्पिटलच्या बाहेर नेले. थोड्यावेळाने बळीराम पाटील व यश पोळ मोटारसायकलवरून आले व त्यांनी डोके व जाधव यांना पुन्हा मारहाण करून त्यांना हॉस्पिटलच्या बिलिंग रुममध्ये नेऊन कोंडून ठेवले. थोड्यावेळाने डॉ. प्रशांत जाधव आले. त्यावेळी त्यांच्या हातात लोखंडी गज होता. या वेळी हॉस्पिटल स्टाफ मधील कृष्णराज पाटील, बाळकृष्ण पाटील, यश पोळ व बळीराम पाटील यांनी डोके यांना धरले आणि डॉ. जाधव यांनी गजाने त्यांच्या पाठीवर, तोंडावर मारहाण केली. डोके यांनी गजाचा मार चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या चेहर्‍यावर, ओठावर, पाठीवर मार लागला आणि जखम झाली. यावेळी डॉ. प्रशांत जाधव व इतरांनी त्यांना शिवीगाळ करीत माऱहाण केली. डोके यांना मारहाण होत असताना त्यांचे नातेवाईक देवीदास सुपेकर, राजेंद्र काळभोर, अनंत आजबे, अक्षय जाधव तेथे आले आणि त्यांनी डॉक्टरांच्या ताब्यातून आकाश डोके यांची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जाधव यांनी जामखेड पोलिस ठाण्यात डॉक्टर प्रशांत जाधव यांच्यासह कृष्णराज पाटील, बाळकृष्ण पाटील, यश पोळ, बळीराम पाटील यांच्याविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली. जामखेड पोलिसांनी या गुन्ह्याची शून्य क्रमांकाने नोंद केली असून हा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

COMMENTS