जगातील मोजक्या देशात जरी क्रिकेट खेळले जात असले, तरी अन्य क्रीडाप्रकारांपेक्षा त्याची लोकप्रियता अफाट आहे. त्यामुळे कोरोना असो, प्रेक्षक नसोत किंवा अन्य कोणतीही कारणे क्रिकेटकडे आणि पर्यायाने क्रिकेटपटूंकडे येणारा पैशाचा ओघ कायम आहे.
मुंबई/प्रतिनिधीः जगातील मोजक्या देशात जरी क्रिकेट खेळले जात असले, तरी अन्य क्रीडाप्रकारांपेक्षा त्याची लोकप्रियता अफाट आहे. त्यामुळे कोरोना असो, प्रेक्षक नसोत किंवा अन्य कोणतीही कारणे क्रिकेटकडे आणि पर्यायाने क्रिकेटपटूंकडे येणारा पैशाचा ओघ कायम आहे. त्यामुळे जगात, देशात आणि बाजारात मंदी असतानाही क्रिकेटपटूंचे लिलाव कोटीत होतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
क्रिकेटसारखे अर्थकारण इतर कोणत्याही खेळाचे नाही. क्रिकेटमधील लोकप्रियता नुसती टिकवूनच ठेवून उपयोग नसतो, तर ती वाढत राहावी यासाठीची जी उच्च कोटीची व्यावसायिकता लागते ती व्यावसायिकता क्रिकेटची धुरा वाहणारांकडेच आहे. त्यामुळे मैदानात प्रेक्षक नसले, तरी क्रिकेटकडे येणारा पैशांचा ओघ कायम आहे. कोरोनाच्या सावटातही बीसीसीआयने खेळाडूंना सप्टेंबर 2021पर्यंत करारबद्ध करताना त्यांची रक्कम ‘जैसे थे’ ठेवलेली आहे. ठरल्याप्रमाणे मंडळाची जी सर्वोच्च श्रेणी आहे ‘ए प्लस’, त्यातील क्रिकेटपटूंना वार्षिक सात कोटी रुपये, ‘ए’ श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी रुपये, ‘बी’ श्रेणीसाठी तीन कोटी रुपये आणि ‘सी’ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत. याखेरीज प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये, वन डे सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तीन लाख रुपये सामना शुल्क म्हणून मिळतात. जाहिराती व प्रायोजकत्वातून येणारा पैसा वेगळा. साहजिकच क्रिकेटपटू बनला म्हणजे पैसाच पैसा हा जो लोकांचा समज झाला आहे तो चुकीचा नाही; परंतु हे सर्वांनाच साध्य होत नाही. भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यात असे खेळाडू फक्त 25 ते 30 असतात आणि त्यांची जागा घेण्यासाठी 25 ते 30 हजार खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. या 25 ते 30 खेळाडूंमध्ये यंदा ज्यांनी स्थान मिळविले, त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसारखे ‘ए प्लस’ श्रेणीतील नेहमीचे चेहरे आहेत; शिवाय शुभमन गिल, अक्षर पटेल व मोहम्मद सिराजसारखे नवे चेहरेसुद्धा आहेत. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांना वरच्या श्रेणीचे बक्षीस मिळाले आहे. दुखापतींमुळे कामगिरीत सातत्य राखू न शकलेला भुवनेश्वर कुमार आणि कामगिरी घसरलेले युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांची श्रेणी घसरली आहे. मनीष पांडे व केदार जाधव हे तर बादच झाले आहेत. चांगली कामगिरी केली तर बढती, नाही तर खालची श्रेणी किंवा थेट बाद. यंदा टी. नटराजन, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन अशा उमद्या आणि चुणूक दाखविलेल्या खेळाडूंना करार मिळायला हवा होता अशी चर्चा आहे; पण जे करारबद्ध खेळाडू आहेत, त्यांच्यापैकी कुणी योग्यतेचा नाही असे मात्र नाही. या करारांचा दुसरा फायदा असा, की नावाजलेला खेळाडू असो की नवोदित; जो कामगिरी दाखवील त्याला त्याच्या कामगिरीनुसार श्रेणी मिळेल. कुणी मोठा, कुणी छोटा असा भेद नाही. शिवाय करारबद्ध खेळाडूंच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मंडळ उचलत असते.
गुणवत्ता हाच निकष
नवोदित खेळाडूला संघात स्थान मिळणे, त्याने सातत्य दाखवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण देशात इतके गुणवंत खेळाडू आहेत, की एकाची जागा घेण्यासाठी दुसरा हजरच असतो. काही सामने जरी एखाद्या खेळाडूची कामगिरी वाईट झाली, तर तो कायमचाच संघाबाहेर जाऊन ‘माजी खेळाडू’ होऊ शकतो; पण स्पर्धेच्या जगात याला पर्याय नाही. कर्णधाराच्या मूल्यमापनाचा दोष वगळला, तर सातत्याने चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हीच पद्धत योग्य आहे.
COMMENTS