आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे.
मुंबई / प्रतिनिधीः आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगचा अहवाल नवाब मलिका यांनीच फोडला असल्याचा आरोप केला.
मलिक यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसर्या प्रकरणाने झालेली नाही. मला माहिती आहे नवाब मलिक का चिंतेत आहेत?, कारण त्यांना हे माहिती आहे, की फोन टॅपिंगचा जो अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे, त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटते आहे. मी पहिली दोन पानेच दिली होती; पण मी हा सवाल विचारू इच्छितो, की बदल्यांमध्ये पैसे खाल्ल्याने, दलाली केल्याने आणि वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलिसांची बदनाम झाली, की महाराष्ट्र पोलिसांचे नाव झाले? आणि म्हणून खर्या अर्थाने हे जे सगळे वाझेचे मालक आहेत, ते आज चिंतेत आहेत. ज्यांनी हे सिंडिकेट राज चालवले, ज्यांनी 17 वर्षांनंतर वाझेला नियमाबाह्य असतानाही महत्वाचे पद दिले आणि ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिल्या त्यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. मुंबई पोलिसांचे नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगले होते, त्याला बदनाम करण्याचे काम केले, आता तेच प्रश्न विचारत आहेत. अगोदर स्वतःकडे वाकून पाहा मी समजू शकतो, तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही आमच्यावर कितीही आरोप लावा, आम्हाला काही चिंता नाही, असे फडणवीस म्हणाले.
वाझेंचे तीन मालक घाबरले
मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील? जेवढे वाझेचे मालक आहेत, ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत, की आता कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर येतील? कारण ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत, यावरून हे लक्षात येते, की एक प्रकारचे सिंडेकेट राज सुरू होते. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही नाही केली, असा दावा फडणवीस यांनी केला.
COMMENTS