पोलिसांनी वसूल केला  23 लाख रुपयांचा दंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांनी वसूल केला 23 लाख रुपयांचा दंड

जनता कर्फ्यू व लॉकडाऊन निर्बंध जारी असताना रस्त्यावर विनाकारण फिरणारांवर जिल्हा पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

रिक्षांना लागणार चालकाची माहिती असणारे स्टीकर
लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार
जामखेड शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर/प्रतिनिधी- जनता कर्फ्यू व लॉकडाऊन निर्बंध जारी असताना रस्त्यावर विनाकारण फिरणारांवर जिल्हा पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पाच दिवसांमध्ये 23 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यात एकूण पाच हजार 732 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

कोविड संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी तसेच जनता कर्फ्यू व लॉकडाऊन निर्बंधही लागू आहेत. यातील कलमांचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तरीही काहीजण रस्त्याने काम नसताना फिरत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले आहे. अत्यावश्यक कामासाठी जाणारांना त्यांच्या कामाचे महत्त्व पाहून सवलत दिली जाते. पण काहीजण काही काम नसताना फिरत असल्याने त्यांना चाप लावण्याचे काम पोलिसांनी सुरू केेले आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांनी पोलीस दलाला प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे व जे विनाकारण फिरत आहे अशांना मज्जाव करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नगर शहरामध्येसुद्धा नाकाबंदी करण्यात आलेली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह नगर-मनमाड महामार्ग, नगर-पुणे महामार्ग व नगर-औरंगाबाद महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे तसेच दुचाकीवाल्यांना सुद्धा विनाकारण फिरत असताना पकडल्यानंतर त्यांच्याकडून किमान दोनशे ते पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. या तपासणीत अनेकजण विनाकारण फिरत आहेत, काहीजणांकडे लायसन्स नाही तर काहीजणांच्या गाडीवर नंबर प्लेट नाहीत, असे आढळून आले आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये साडेचार हजाराहून अधिक वाहनांची तपासणी करून 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दीड कोटीचा दंड वसूल

गेल्या सहा महिन्यांमध्ये कोविड नियम व संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 90 हजार नागरिकांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे असेही पाटील यांनी सांगितले. कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी शासनाने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदीचे उल्लंघन, विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, मंगल कार्यालय दंड अशा 90 हजार 249 केसेस करुन 1 कोटी 52 लाख 24 हजार 370 रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर भादवि 188 प्रमाणे 26 हजार 856 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 31 हजार 148 आरोपी आहेत. दि. 15 पासून जिल्ह्यामध्ये कडक निर्बध लागू करण्यात आले असून, विनाकारण बाहेर फिरणार्‍या 489 नागरिकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 69 प्रमाणे कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आले व समज देऊन सोडून देण्यात आले तसेच 253 वाहने पोलीस स्टेशनला अटकाव करुन समज देऊन व कार्यवाही करुन सोडले आहे. 

COMMENTS