पुन्हा येतोय तसाच वास…कोतवालीचे धाबे दणाणले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा येतोय तसाच वास…कोतवालीचे धाबे दणाणले…

अहमदनगर/प्रतिनिधी - सुमारे 15 दिवसांपूर्वी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहात निवृत्त एसटी कामगाराचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाल

एकाच दिवशी दोन महापौर…आणि बदलला कायदा
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण
जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी

अहमदनगर/प्रतिनिधी – सुमारे 15 दिवसांपूर्वी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहात निवृत्त एसटी कामगाराचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह सापडण्याआधी या परिसरात जशी दुर्गंधी पसरली होती, तशीच दुर्गंधी पुन्हा एकदा सोमवारी (1 नोव्हेंबर) या पोलिस ठाण्याच्या आवारात सुटल्याने ड्युटीवरील पोलिसांचे धाबे दणाणले. या दुर्गंधीचा सगळीकडे माग घेतला, पण ती कोठून येते हे सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांना शोधूनही दुर्गंधीचे उगमस्थान सापडत नसल्याने अखेर महापालिकेला कळवले गेले, पण महापालिकेचे पथकही फिरकले नाही. परिणामी, तशा दुर्गंधीचे साम्राज्य रात्रीही कायम होते. मात्र, त्यामुळे ड्युटीवरील पोलिसांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मागील 20 ऑक्टोबरला कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहात असलेल्या स्नानगृहात ज्ञानेश्‍वर तुकाराम मराठे (वय 62, रा. फलटण, सातारा) या निवृत्त एसटी कर्मचार्‍याचा मृतदेह सापडला होता. स्नानगृहातील नळाला लुंगीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस येण्याआधी स्वच्छतागृह व परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यादरम्यान कोतवाली पोलिसांनी नगर शहरात अवैध गोमांस विक्रीच्या ठिकाणी छापे मारून काही क्विंटल गोमांस जप्त करून ते पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवले होते. दोन-तीन दिवसांपासून ते तेथेच असल्याने त्याची दुर्गंधी येत असावी म्हणून पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण स्वच्छतागृहात जाणार्‍या प्रत्येकाला प्रचंड दुर्गंधी जाणवत असल्याने अखेर स्वच्छतागृहाची पाहणी केली गेली. त्यावेळी स्नानगृहात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा सोमवारी कोतवालीच्या आवारात अशीच दुर्गंधी सुटल्याने ड्युटीवरील पोलिस हबकून गेले. आता कोणती दुर्घटना समोर वाढून ठेवली, असा विचारही मनात तरळला. पण दुर्गंधीच्या शोध घेण्याचे कर्तव्यही समोर असल्याने दिवसभर पोलिस स्वतःची कामे सांभाळून या दुर्गंधीच्या उगमाचा शोध घेत होते. पोलिस ठाण्याच्या पाठीमागे व डाव्या बाजूला जप्त केलेल्या वाहनांच्या परिसरात, स्वच्छतागृहात व परिसरातील कानाकोपर्‍यात शोध घेतला गेला. पण दुर्गंधी कोठून येते, याचा शोध लागत नसल्याने अखेर महापालिकेला कळवले गेेले. पण मनपाच्या पथकाही फिरकले नसल्याने सायंकाळी व रात्रीही दुर्गंधी कायम होती.

तो तपास सीआयडीकडे
कोतवाली पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहात 20 ऑक्टोबरला सापडलेल्या ज्ञानेश्‍वर मराठे या निवृत्त एसटी कर्मचार्‍याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मराठे यांनी आत्महत्या का केली व कोतवाली पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहातच का केली, यासह अन्य अनुषंगिक प्रश्‍नांची उत्तरे आता सीआयडी पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

COMMENTS