ऑलिम्पिकला क्रीडा क्षेत्राचा जागतिक महोत्सव मानला जातो. या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धक सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न घेऊन येत असतो. फार थोडया
ऑलिम्पिकला क्रीडा क्षेत्राचा जागतिक महोत्सव मानला जातो. या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धक सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न घेऊन येत असतो. फार थोडया जणांना आपले स्वप्न पूर्ण करता येते. जिम्नॅस्टिक्सपटूप्रमाणे असलेली शारीरिक लवचीकता आणि हाताची चपळ गती, या बलस्थानांच्या बळावर नीरज चोप्राने सोनेरी यश मिळवले. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर यंदाच्या टोकियो ऑलिम्पकमध्ये भारताच्या झोळीत सुवर्णपदक पडलं. नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत भालाफेकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अॅथलेटिक्समध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरली. भारतासारख्या अखंडप्राय देशात असणार्या 139 कोटी लोकसंख्या असणार्या देशात अनेक वर्षांपासून असलेला सुवर्णपदकांंचा दुष्काळ अखेर भालाफेक पटू नीरज चोप्राने घालवला. नीरज चोप्राचे यश निर्भळ असून कौतुकास्पद आहे. जन्मतःहा कुणीच विजेता नसतो. त्या खेळातील प्राविण्य, मेहनत आणि विजीगिषी वृत्तीच्या जोरावर हे यश खेचून आणता येते. त्यासाठी असावी लागते, अपार मेहनत. नीरज चोप्राने देखील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी कठोर मेहनत घेतली. त्यामुळेच नीरज चोप्राला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली. नीरजची कहाणी सुरू होते पानीपतच्या एका छोट्याशा खेड्यातून. लहानपणी नीरजचं वजन खूप जास्त होतं. जवळपास 80 किलो. गावात सगळे त्याला सरपंच म्हणायचे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी नीरजने पानीपतच्या स्टेडियममध्ये जायला सुरुवात केली. तिथेच भालाफेक खेळाची ओळख झाली आणि इथूनच करिअरची सुरुवातही झाली. खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नीरज पानीपतहून पंचकुलाला शिफ्ट झाला. पंचकुलामध्ये पहिल्यांदा त्याचा सामना राष्ट्रीय खेळाडूंशी झाला. तिथे खेळासाठीच्या अधिक चांगल्या सोयी-सुविधा होत्या. राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केल्यावर हातात उत्तम दर्जाचा भालाही आला. हळूहळू नीरजच्या खेळात सुधारणा होऊ लागली. 2016 साली एकीकडे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणार्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता त्याचवेळी अॅथलेटिक्स विश्वास भारतातच एका कोपर्यात नवीन तार्याचा उदय होत होता. याच वर्षी नीरजने पोलंडमध्ये अंडर-20 जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. बघता बघता या खेळाडूचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झळकू लागलं.
नीरजने गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86.47 मीटर भालाफेक करत गोल्ड मेडल पटकावलं. तर 2018 साली एशियन गेम्समध्ये 88.07 मीटर भालाफेक करत राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक पटकावले. नीरज चोप्राची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीयांची मान उंचावणारी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद होती.
दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धांच्या झगमगाट आणि त्यातून निर्माण होणार्या प्रश्नांकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. ऑलिम्पिक स्पर्धेला 1896 पासून सुरुवात झाली. त्यानंतर दीर्घ काळ या स्पर्धांचे आयोजन हे केवळ क्रीडा स्पर्धा म्हणून केले जात होते. परंतु त्यानंतर त्याचे स्वरूप भव्य झाले. सुरुवातीला केवळ आयोजित शहरातील लोक आनंद घेऊ शकत होते पण 1964च्या टोक्यो ऑलिम्पिकपासून या स्पर्धा जगभर टीव्ही माध्यमांतून प्रसारित व्हायला लागल्या. त्यानंतर जाहिरात, प्रसारणाचे हक्क यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा प्रवाहित व्हायला लागला. यालाच यजमान पद भूषवणारे शहर आणि राष्ट्र स्वतःची प्रतिमा जगासमोर सादर करण्याची संधी म्हणून बघायला लागले. यजमान शहरात मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधांची निर्मिती व्हायला लागली, मर्यादित वेळेत पूर्ण करायच्या शहर विकासाच्या योजना यायला लागल्या. त्याच सोबत डोळे दिपवून टाकणा-या सोहळ्यात त्याचे रुपांतर झालं. पण यातून ऑलिम्पिकचे आयोजन करणार्या शहरांवर, तेथील नागरिक यांच्या जीवनावर खूप परिणाम झाले. ऑलिम्पिक व्हिलेज निर्मितीपासून, सुविधांची निर्मिती, नागरिकांचे विस्थापन, ऑलिम्पिक पश्चात उद्ध्वस्त इमारतींचे सापळे, स्टेडियमचे पांढरे हत्ती, सरकारवर उभे राहणारे कर्जाचे डोंगर असे अनेक प्रश्न या शहरांना भेडसावत आहे. यातून कुठेतरी विचारमंथन करण्याची खरी गरज आहे.
COMMENTS