नगर अर्बन बँक निवडणुकीत राजकीय एन्ट्रीला सुरुवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँक निवडणुकीत राजकीय एन्ट्रीला सुरुवात

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीत आता राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या पक्षांच्या एन्ट्रीला सुरुवात होण्याची चिन्हे

शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
तीन-चारजणांनी नगर अर्बन बँकेवर निवडणूक लादली ; माजी संचालक गांधींचा आरोप, रिंगणात आतापर्यंत 58 जण उमेदवार
नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीत आता राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या पक्षांच्या एन्ट्रीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. या बँकेवर तसा कोणत्याही राजकीय पक्षाचा वरचष्मा नाही. पण मागच्या निवडणुकीत या बँकेचे नेतृत्व करणारे माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी भाजपचे असल्याने काहीसा वरचष्मा भाजपचा बँकेवर राहिला आहे. अर्थात त्यावेळी गांधींसमवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (स्व.) सुवालाल गुंदेचाही होते. पण राजकीय पाठबळ भाजपचेच या बँकेला मानले गेले. या पार्श्‍वभूमीवर अर्बन बँक बचाव कृती समितीने ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे आता अन्य पक्षीय या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कसे सहभागी होतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
नगरमधील नगर अर्बन बँक, नगर मर्चंटस बँक व शहर सहकारी बँक या तीन मोठ्या आर्थिक संस्थांवर तसे पाहिले तर कोणत्याही एका राजकीय पक्षाचे वर्चस्व नाही. या तिन्ही बँकांच्या संचालक मंडळात विविध पक्षांना मानणारे आहेत. नगरच्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, मनसे वा अन्य पक्षांनीही या बँकांच्या निवडणुका कधी पक्षीय पातळीवर लढवल्या नाहीत. फक्त आपल्या पक्षाचे समर्थक या बँकांच्या संचालक मंडळात कसे दिसतील, याची काळजी मात्र घेतली. या पार्श्‍वभूमीवर आता तब्बल सात वर्षांनी नगर अर्बन बँकेची निवडणूक होत असल्याने यातही राजकीय पक्षांचा थेट सहभाग असण्याची शक्यता कमी आहे. पण पडद्याआड राहून स्वपक्षीयांना बँकेच्या संचालक मंडळात स्थान कसे मिळेल, याची काळजी मात्र राजकीय पक्षांकडून नक्कीच घेतली जाईल, असे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बँक बचाव कृती समितीने ज्येष्ठ नेते गडाख यांचे आशीर्वाद घेऊन पहिले पाऊल उचलले असल्याने आता अन्य पक्षीय नेते कशापद्धतीने बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुवालालजींचे विचारच बँकेला तारतील : गडाख
नगर अर्बन बँकेला सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीमधून (स्व.) सुवालालजी गुंदेचा यांचे संस्कार व विचारच बाहेर काढू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बँक बचाव समितीच्या सदस्यांनी गडाख यांची त्यांच्या सोनई येथील निवासस्थानी भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना गडाख यांनी (स्व.) सुवालालजींची आठवण काढली. ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याचे एकेकाळचे सहकार वैभव असलेली व 110 वर्षाची परंपरा असलेली नगर अर्बन बँक चुकीचा कारभार व चुकीच्या कर्जवाटपामुळे अडचणीत आली आहे. (स्व.) सुवालालजी गुंदेचा यांनी बँकेत निष्कलंक व सर्वसामान्यांची कामे केल्याची आठवण नक्कीच होते. त्यांचे व माझे खूप निकटचे संबंध होते. बँक आदर्शवत कशी चालवावी हे सुवालालजींकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या हाताखाली तयार झालेले राजेंद्र गांधी व मनोज गुंदेचांसारखे सहकारातील अभ्यासू व्यक्ती नगर अर्बन बँक वाचविण्यासाठी जी धडपड करीत आहेत, ती कौतुकास्पद आहे व त्यांना आमचे पूर्ण सहकार्य राहील असे गडाख यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी चर्चा करताना राजेंद्र गांधी व मनोज गुंदेचा यांनी सांगितले की, काही अनुभवी संचालक, काही सीए व काही अ‍ॅडव्होकेटस यांना घेवून सर्वांना अभिमान व विश्‍वास वाटेल असे पॅनेल आम्ही देत आहोत व लवकरच तशी घोषणा करत आहोत. आमच्या पॅनेलमध्ये घोटाळ्यांचा आरोप असलेला एकही उमेदवार असणार नाही तसेच बँकेच्या वसुलीसाठीची इच्छा व वेळ देण्याची तयारी असणारे सेवाभावी व्यक्तीमत्व हे निकष लावूनच उमेदवार घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
दीर्घकाळ चाललेल्या या चर्चेत (स्व.) सुवालालजींच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी बँक बचाव समितीचे मेहूल भंडारी व सोनई येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रदीप चंगेडे उपस्थित होते. गडाख यांनी बँक बचाव समितीच्या कार्याचे कौतुक करतानाच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिलेमुळे आमच्या बँक वाचविण्याच्या कार्यात मोठा उत्साह निर्माण झाल्याची भावना भंडारी यांनी व्यक्त केली.

भळगट यांची इच्छा
यावेळी (स्व.) सुवालालजींचे निकटचे स्नेही व ज्येष्ठ व्यक्तिमत्व विश्‍वासराव गडाख यांनी सोनई, नेवासा परिसरातून (स्व.) सुवालालजींना मानणारा उमेदवार द्यावा, अशी सूचना केली. या सूचनेवर सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन राजेंद्र गांधी व मनोज गुंदेचा यांनी दिले. (स्व.) सुवालालजींचे खास कार्यकर्ते व नगर अर्बन बँकेशी 40 वर्षापासून जोडले गेलेले संजय भळगट यांनी उमेदवारी करणेची इच्छा यावेळी व्यक्त केली.

COMMENTS