एकेकाळी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखले जायचे व तसे अनेकदा वाटायचेही. पण आता क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे की, ठरवून खेळला जाणारा खेळ आहे हे स
एकेकाळी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखले जायचे व तसे अनेकदा वाटायचेही. पण आता क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे की, ठरवून खेळला जाणारा खेळ आहे हे सामान्य रसिकांच्या समजण्या पलिकडचे झाले आहे. सध्या भारताच्या संयोजनात युएईत सातवी टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा सुरु असून यजमान टिम इंडियाचा खेळ पाहिल्यानंतर वरील वाक्य तंतोतंत सत्य असल्याचे आपल्यालाही नक्कीच पटले असेल, हो ना ?
टिम इंडिया जगातील एक पॉवरफुल टिम म्हणून गणली जाते. इतकेच नाही तर या स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांमध्ये जगभरातील तमाम आजी माजी क्रिकेटपटू, क्रिकेट पंडित व समिक्षकांसह भारतातील सर्वच प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी वारेमाप हवा करून टाकली होती. त्यामुळे असे वाटायला लागले होते की, भारत खरोखर जगातला ताकदवान संघ आहे. शिवाय मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या दोन सराव सामन्यात टिम इंडियाने टि ट्वेंटी क्रिकेटमधील अग्रणी संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलियाला एखाद्या चिल्लर संघासारखे हरविल्याने टि इंडिया खऱ्या अर्थाने वर्ल्ड चॅंपियन वाटायला लागली.
मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तथाकथीत वर्ल्ड चॅंपियन टिम धाडकन जमिनीवर आदळली. नुकतीच आदळली नाही तर या टिमचे त्यांच्या काल्पनिक विश्वकपासह अनगिणत तुकडे तुकडे झाले. मॅन इन ब्ल्यू म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या टिम इंडियाला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने अशी काही अद्दल घडविली की पुढील कित्येक वर्ष या जखमा कोणत्याही जालिम औषधानेही भरून येणार नाहीत. या सामन्यापूर्वी सलग बारा वेळा विश्वचषकात भारताविरूध्द पराभूत झालेल्या पाकला कोणी किंमत द्यायलाच तयार नव्हते. शिवाय भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी असे काही बेताल वक्तव्य करून भारताला सामन्यापूर्वी विजयी घोषित करून टाकले. त्यातच भारताच्या प्रसिध्दी माध्यमांनी समस्त पाकिस्तानच्या भावना दुखावणाऱ्या जाहीराती सुरू केल्याने प्रत्येक पाकिस्तानी पेटून उठला. त्यांच्या खेळाडूंमध्येही टिम इंडियाला लोळविण्याचे बळ आले, आणि मग त्यानंतर काय घडले ते साऱ्या जगात उघड्या डोळ्याने अवाक होऊन बघितले.
पिसाळलेळ्या वाघाप्रमाणे चवताळलेल्या पाक क्रिकेटपटूंनी टिम इंडियाची खेळाच्या सर्वच क्षेत्रात नाकाबंदी करून कोणाच्या स्वप्नातही नसेल इतका दणकून मार दिला. या अविश्वसनिय पराभवाने टिम इंडियाच नव्हे तर तमाम क्रिकेट जगतच हादरले. हे कमी की, काय म्हणून टिम इंडियाचा नवा क्रिकेटींग दुश्मन न्यूझिलंडनेही पाकिसानचाच कित्ता गिरवला. किवीज संघाने दिलेला धक्का इतका जबरदस्त होता की टिम इंडिया बरोबरच त्यांच्या उंपात्य फेरीत पोहोचण्याच्या आशांनाच सुरूंग लागला. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेट शौकिन शोकसागरात डुबले. भारतात टिम इंडिया, बीसीसीआय, आयपीएलसह आयसीसीही क्रिकेट शौकिनांच्या रागाच्या रडारवर आले. कर्णधार कोहली तर सर्वांचं टारगेट बनला होता. सर्वत्र चर्चा सुरू झाली की, संघात दुफळी आहे. सामने फिक्स आहेत. सर्व काही पैशांसाठी केलं जातं, यात सामान्य रसिकांच्या भावनांचा विचारच केला जात नाही. या बरोबरच टिम इंडियाचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दरवाजे उघडण्याचे मार्ग तपासले जात होते.
त्याच ओघात दिपपर्वाच्या धनतेरसच्या शुभमुहुर्तावर टिम इंडियाची गाठ अफगाणिस्तानशी पडली. मागील दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावल्याने अवसान गळालेल्या टिम इंडियाने या सामन्यातही नाणेफेक गमावली मात्र यावेळी टिम इंडिया वेगळ्याच ताकदीने उतरली व गोलंदाजी ताकदवान असलेल्या आफगाणि गोलंदाजांना टिम इंडियाच्या फलंदाजांनी मैदानाच्या चहूकडे पिंगविले. पाक व न्यूझिलंड समोर शेळपट वाटणारे रोहीत शर्मा व केएल राहुल अफगाणिस्तान समोर ढाण्या वाघासारखे खेळले. इतके नाही तर या दोघांनी टि ट्वेंटीतील टिम इंडियाची आजवरची सर्वोत्तम सलामीही नोंदविली. यानंतर जो हार्दिक पांड्या संघाला डोईजड होत होता त्या हार्दिकने पुर्ण फिट झाल्यागत रिषभ पंतसह टिम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. टिम इंडियाने जणू मागच्या दोन्ही सामन्यांची कसर या सामन्यातच काढून घेतली.
यानंतर पाळी होती ती गोलंदाजांची. मागच्या दोन सामन्यात केवळ दोन बळी घेणाऱ्या गोलंदाजांनी यावेळी अफगाणी फलंदाजांना उधळू न देता सावध शिकार केली. सापत्न वागणूक मिळत असलेल्या रवीचंद्रन आश्विनने तिखट व नियंत्रीत मारा करून अफगाण संघाला डांबून ठेवलेच शिवाय भारतीय संघ प्रबंधन व खास करून कर्णधार कोहलीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
टिम इंडियाने हा विजय मिळवून देशवासियांचा राग काहीसा थंड करून दिवाळी सण आनंदात घालविण्याची संधी दिली. मात्र पुढील सामने सरस धावगती व आफगाणिस्तानचा न्यूझिलंडवर विजय या अशक्यप्राय गोष्टींवर अवलंबून असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या एका विजयाने हुरळून जाण्याची गरज नाही. तूर्त तरी टिम इंडियाला शुभेच्छा व संघात सर्व काही अलबेल राहील अशी अपेक्षा करूया.
COMMENTS