दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित

ज्या कार्यालयातून जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन होते तसेच जिल्हाभरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासाला दिशादर्शन होते, त्या नगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनाच चोरांनी हिसका दाखवला आहे.

पाटणकर विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश
संस्थांनी बोगस भरती करून केली शासनाची फसवणूक
‘शरद पवार ज्येष्ठ पत्रकार आरोग्य संरक्षण योजना’ सुरु करावी

अहमदनगर/प्रतिनिधी- ज्या कार्यालयातून जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन होते तसेच जिल्हाभरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासाला दिशादर्शन होते, त्या नगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांनाच चोरांनी हिसका दाखवला आहे. या कार्यालयाच्या आवारातून पोलिसाचीच दुचाकी चोरीस गेली आहे. यानिमित्ताने दिव्याखाली अंधार असल्याची प्रचिती आली आहे.

    नगरच्या औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या नूतन व भव्य पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून पोलिसाचीच मोटरसायकल चोरीस गेली आहे. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे घरफोड्यांसह वाहन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांच्या या धुमाकुळाला आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळेच चोरांची पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून मोटारसायकल चोरून नेण्यापर्यंत मजल गेली आहे.

पोलिसालाच बसला फटका

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली चाळीस हजार रुपये किमतीची अव्हेटर दुचाकी मोटरसायकल (क्रमांक एमएच सोळा सीबी 8239) ही अज्ञात चोराने चोरून नेली. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांना कसलीच माहिती नाही. पोलिस कर्मचारी रमेश शांतवन साळवे (वय 49, नेमणूक पोलिस मुख्यालय, अहमदनगर) हे त्यांच्या शासकीय कामासाठी 2 जूनला पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले असता त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये लावली होती. काम आटोपून ते बाहेर आले असताना त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही. त्यांनी दुचाकीचा अधीक्षक कार्यालयाच्या आवारात व पार्किंगमध्ये शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. प्रवेशद्वारावरील ड्युटीवर असलेल्या पोलिसांनाही याबाबत काही माहिती नव्हते. यावरून मोटारसायकल चोरीस गेली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर चुकून कोणी आपली गाडी नेली असेल व लक्षात आल्यावर ती पुन्हा येथे आणून लावली जाईल, अशी त्यांना आशा होती. पण आठ दिवस वाट पाहूनही तसे काही घडले नसल्याने अखेर त्यांनी भिंगार पोलिसात तक्रार दिली व त्यावरून पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक जगताप करीत आहेत.

नागरिकांच्या रक्षणाचे काय?

पोलिस आपल्या वाहनांचे रक्षण करू शकत नसतील तर ते नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण काय करणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. डोळ्यात तेल घालून गुन्हेगारांच्या मुसक्या बांधणारे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अन्य विभागांतील पोलिस कर्मचार्‍यांच्या वाहनांची कार्यालयाच्या आवारातून चोरी होणे म्हणजे गुन्हेगारी संपविण्याची भाषा करणार्‍या पोलिसांच्या दिव्याखाली अंधार असल्याचे दिसू लागले आहे. मध्यंतरी अन्यत्र चोरीस गेलेल्या दुचाकी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून लावून ठेवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यामुळे चोरीस गेलेली वाहने येथे सापडणे व येथून पोलिस कर्मचार्‍यांची वाहने चोरीस जाण्याच्या प्रकारांमुळे पोलिस अधीक्षक कार्यालय चर्चेत मात्र आले आहे.

COMMENTS