तब्बल 66 लाख़ रुपये खर्चून मनपा लावणार 5 हजार झाडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 66 लाख़ रुपये खर्चून मनपा लावणार 5 हजार झाडे

उद्या होणार निर्णय, 30 लाखात शिवपुतळाही करणार

अहमदनगर/प्रतिनिधी : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…गाणे आळवत नगर मनपाने नगर शहरातील सावेडीचा परिसर हिरवागार करण्याचे ठरवले आहे. तब्बल सुमारे 66 लाख रुप

नगरमध्ये अल्पवयीन मुलगी व महिला बेपत्ता
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात
BREAKING: अनिल देशमुख यांचं राजीनामा | Anil Deshmukh Resign | Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…गाणे आळवत नगर मनपाने नगर शहरातील सावेडीचा परिसर हिरवागार करण्याचे ठरवले आहे. तब्बल सुमारे 66 लाख रुपये खर्चून नगर शहराच्या सावेडीतील चार प्रभागांत 5 हजार झाडे लावली जाणार आहेत. याशिवाय औरंगाबाद महामार्गावरील मनपा मुख्यालयाच्या आवारात 30 लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित ब्राँझचा पुतळाही उभारण्यात येणार आहे. या दोन मुख्य निर्णयांसह अन्य विकासात्मक कामांच्या निविदांचे निर्णय उद्या गुरुवारी (10 मार्च) सकाळी साडे अकरा वाजता स्थायी समितीच्या बैठकीत होणार आहेत.
नगर शहरात अनेक स्वयंसेवी संस्थांद्वारे दरवर्षीच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचे जोरदार उपक्रम होतात व त्यांची प्रसिद्धीही दणकेबाज होते. मनपाद्वारेही शासनाची वृक्षारोपण मोहीम होते. पण यात लावली गेलेली झाडे जिवंत आहेत की नाहीत, हे पुढे वर्षभर अभावानेच पाहिले जाते. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतूनही मनपाद्वारे सुमारे 3 कोटी रुपये खर्चून हरितपट्टे विकसित करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, ते अस्तित्वात आहेत की नाही, यावरूनही नेहमी स्थायीच्या बैठकीत वा महासभेत चर्चा झडतात. या पार्श्‍वभूमीवर आता नव्याने मनपाने प्रभाग 1 ते 4 या चार प्रभागात प्रत्येकी 1 हजार 250 याप्रमाणे एकूण 5 हजार वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. यासाठी 94 लाख 20 हजार रुपये खर्चाची निविदा रक्कम मनपाने निश्‍चित करून निविदा प्रसिद्धी केली. त्यानंतर यासाठी चार निविदा आल्या व यात निविदा रकमेपेक्षा 30 टक्के कमी दराने म्हणजे 65 लाख 94 हजारात वृक्षारोपणाचे काम करण्याची तयारी वळसे पाटील एन्टरप्रायजेस संस्थेने दाखवली आहे. त्यामुळे आता या कामासाठी हीच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. अन्य तीन निविदांपैकी एका संस्थेने 1 कोटी 13 लाख, दुसरीने 83 लाख 84 हजार व तिसरीने 90 लाख 23 हजाराचा खर्च सांगितला होता. त्यामुळे गुरुवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

शिवपुतळा होणार
मनपाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला ब्राँझ धातूचा पुतळा बसवला जाणार आहे. मागील तीन-चार वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. पण हा पुतळा बसवावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक कुमारसिंह वाकळे हेच आता स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असल्याने आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी या पुतळ्याचा विषय मार्गी लावला आहे. या पुतळ्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत आलेल्या चार निविदांपैकी पुण्याच्या ऋषी आर्ट संस्थेने 30 लाख 24 हजार रुपये खर्चात पुतळा बसवण्याची तयारी दाखवली आहे. अन्य तीन संस्थांनी 61 ते 79 लाखापर्यंतचा खर्च सांगितला आहे. त्यामुळे गुरुवारी स्थायी समिती याबाबत काय निर्णय घेते, याची उत्सुकता आहे.

शुक्रवारी येणार बजेट
महापालिकेचे 2021-2022चे सुधारीत व सन 2022-23चे मूळ अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने तयार केले असून, ते स्थायी समितीला शुक्रवारी (11 मार्च) सकाळी साडेअकरा वाजता सादर केले जाणार आहे. या बजेटवर स्थायी समितीत चर्चा होऊन या समितीच्या शिफारशीसह अंतिम मंजुरीसाठी नंतर ते महासभेत सादर होणार आहे.

COMMENTS