ज्ञानाची, देवाची दारे उघडतांना …

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ज्ञानाची, देवाची दारे उघडतांना …

राज्यात कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्याचबरोबर धार्मिक स्थळे, सिनेमागृहे देखील बंद होती. कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता लक्षा

भाजपशासित राज्यात नेतृत्वबदलाचा अन्वयार्थ
समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ
राष्ट्रवादी काँगे्रसमधील संभ्रमता


राज्यात कोरोनामुळे तब्बल दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्याचबरोबर धार्मिक स्थळे, सिनेमागृहे देखील बंद होती. कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर निर्बंध लादले होते. मात्र आता या निर्बंधातून सुटका करत, शाळा, प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वास्तविक पाहता, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका अनेक तज्ज्ञांनी दर्शविला असला तरी, काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव, रक्षाबंधन, यासारखे अनेक धार्मिक सण-उत्सव साजरे झाले. यावेळी कोरोनाचा भडका उडेल, रुग्णांची संख्या वाढेल असा अंदाज होता, तो फोल ठरला. यामागची कारणे म्हणजे, लसीकरण आणि नियमांचे पालन केल्यास आपण कोरोनाची तिसरी लाट थोपवू शकतो, याचा प्रत्यय आला. आज देशभरात आणि राज्यांचा विचार केला तरी रुग्णसंख्या खूप मोठया प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे ज्ञानाची मंदिरे उघडण्याची गरज होती, आणि ती मानसिकता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केली, ते बरेच झाले. एक शतकभरांचा जरी विचार केला, तरी अशा वर्षांनुवर्षे शाळा बंद राहिल्याचे कधी दिसले नाही. स्वातंत्र्य भारतात तरी याचा कधी प्रत्यय आला नाही. मात्र कोरोनामुळे संपूर्ण विश्‍व ढवळून निघाले. ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असले, तरी यातून फार मोठी हानी झालेली आहे. विशेषतःग्रामीण भागाची. कारण विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी महागडे मोबाईल नाही. घरात मोबाईल असला, तरी त्याचा वापर घरातील मोठया व्यक्तीकडून करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनायाचा फायदा झाला नाही. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा कोरानामुळे शिक्षणापासून वंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत राहील. शहरातील पालक आपल्या विद्यार्थ्यांप्रती जागरूक असल्यामुळे त्यांचे प्रथम प्राधान्य शिक्षणाला आहे, यात दुमत नाही. मात्र शहरातील देखील मोलमजुरी करणार्‍या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून येते. ही उणीव आगामी दिवसांत भरून काढावी लागणार आहे. अर्थात शिक्षणाचा हा गॅप भरून काढत असतांना नियमांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. राज्यात ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी चे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर शहरी भागात 8वी ते 12 वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. महाराष्ट्रात 15 जूनला शिक्षण सुरू झाले असले तरी शाळा बंद आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेता येत नाही असे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यातही अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता देखील खालावली आहे. एकूणच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. शाळांमध्ये मुले जाताना तयार केलेले नियम महत्त्वाचे असतील. राज्यात आगामी दिवस हे सण उत्सावाचे आहेत. काही दिवसांत नवरात्रोत्स, त्यानंतर दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे शाळा, मंदिरे, सिनेमागृहे उघडण्यास परवानगी देत असतांना, कोरोनाचा उद्रेक होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली तरी प्रत्यक्षात शाळा सुरू करणे आणि त्या चालवणे हे आव्हानात्मक काम आहे. कागदोपत्री कितीही नियम आणि सूचना तयार केल्या तरी स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करताना त्यात अनेक अडचणी आहेत. शाळेत एकाच वेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्‍न शाळा संस्थाचालक आणि पालक दोघांकडूनही विचारला जातो. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

COMMENTS