जगताप-काळे संघर्षात सेना-भाजपची उडी ; खोटे गुन्ह्यांचे प्रकार थांबवण्याची पोलिसांकडे मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगताप-काळे संघर्षात सेना-भाजपची उडी ; खोटे गुन्ह्यांचे प्रकार थांबवण्याची पोलिसांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- एमआयडीसीतील आयटी पार्कच्या विषयावरून शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात सुर

कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांबे
गतवर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचे बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी- एमआयडीसीतील आयटी पार्कच्या विषयावरून शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आता शहर शिवसेना व भाजप यांनीही उडी घेतली आहे. काळे यांची उघडपणे बाजू घेऊन, नगर शहरात पोलिसांवर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याचे होत असलेले प्रकार थांबविण्याची मागणी सेना-भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. काही दिवसांपूर्वी काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत आयटी पार्कला भेट दिली होती व तेथे कोणत्याही आयटी कंपन्या नसल्याचा दावा करून आ. जगताप यांनी नगरमधील युवकांची व त्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे, आयटी पार्क भेटीच्यावेळी त्यांनी अरेरावी व विनयभंग केल्याचा गुन्हा काळेंविरोधात पोलिसात दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना व भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी यावेळी पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे केली.

आमदारांविषयी तक्रार
यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्यावतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पोलिस यंत्रणेवर दबाव आणत हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कोणतीही फिर्याद घेण्याआधी लेखी तक्रार घ्यायला हवी होती. त्याची शहानिशा करून व पडताळणी करून मगच त्या आधारे पुढील कारवाई करायला हवी होती. मात्र, शहराच्या आमदारांनी पोलिसांवर दबाव आणला. त्या ठिकाणी आमदारांचे बगलबच्चे हे पोलिस स्टेशनला ठाण मांडून होते. जर घटना आयटी पार्क मधील होती तर आमदारांचे बगलबच्चे त्याठिकाणी दबाव आणण्याचे काम का करत होते?, असा सवाल यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने उपस्थित केला.

आम्हीपण जाब विचारू
माजी आमदार (स्व.) अनिलभैय्या राठोड हे जसे सामान्यांच्या मदतीला धावून जात होते व सामान्यांवर जर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केला तर स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांना जाब विचारत होते, त्या प्रमाणे आता शिवसेना नेते काम करतील. ज्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी शिवालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नगर शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय दबावाचा वापर करतात व निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात. अशाच प्रकारे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यावर देखील आयटी पार्क पाहणी करण्यासाठी ते गेले असता, त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार महिलेचा बोलावता धनी कोण आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. एमआयडीसी पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी पडून हा खोटा गुन्हा दाखल केला, हे सर्वांना माहीत आहे. पोलिसांनी अशा दबावाला किंवा आमिषाला बळी पडून निष्पाप लोकांवर अन्याय करू नये, बेकायदेशीरपणे वागू नये, हे सांगण्यासाठी शिवसेना व भाजप शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते, असेही यावेळी सांगण्यात आले.

शिवसेना खपवून घेणार नाही
शिवसेनेचे दिवंगत नेते (स्व.) अनिलभैया राठोड यांनी ज्या-ज्यावेळी या शहरात कुणावरही अन्याय झाला, त्या-त्या वेळी अन्यायाच्या विरोधात परखड भूमिका घेण्याचे काम सातत्याने केले. त्याच भूमिकेतून शिवसेना उभी राहणार असल्याचे स्पष्ट करून शहर शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले की, प्रत्येक खोट्या गुन्ह्यात स्थानिक आमदाराचा हस्तक्षेप असतो. त्याच्या निर्देशानुसार पोलीस बेकायदेशीरपणे कसे वागू शकतात? शिवसेना हे कदापि खपवून घेणार नाही. यापुढील काळात माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप झालेल्या प्रत्येक बेकायदेशीर दाखल खोट्या गुन्ह्याची दखल शिवसेना घेईल आणि अन्यायाला वाचा फोडणार आहे. इथून पुढे ज्यांच्यावर असा प्रकार घडेल, त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा. शिवालयाचे द्वार त्यांच्यासाठी उघडे आहे, असे विक्रम राठोड यांनी सांगितले.

एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाही
मी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही व काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाही, असे स्पष्टीकरण आयटी पार्क भेट प्रकरणानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे, फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. पण, मी कुठेही पळून गेलेलो नाही. या खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन घेणार नाही. कारण मी गुन्हा केलेलाच नाही, असे सांगून ते म्हणाले, विरोधकांनी राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपास कामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची भूमिका असून पोलिसांनी अटक केल्यास त्यालादेखील सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. काँग्रेस कार्यकर्ते हे सुसंस्कृत असून संयमी आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण करून नगर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे कृत्य ज्यांनी यापूर्वी केले, तसे नीच दुष्कृत्य काँग्रेस कार्यकर्ते कदापि करणार नाहीत. काँग्रेस कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाहीत. पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास अथवा अटक केली तरी जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोरून मला काँग्रेस कार्यकर्ते पळवून देखील नेणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी देखील याबाबतीत निश्‍चिंत राहावे, असेही काळे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

COMMENTS