घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांनी आणला महापालिकेला वात ; 88 हजारावर नगरकरांकडे तब्बल 203 कोटीची येणे बाकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांनी आणला महापालिकेला वात ; 88 हजारावर नगरकरांकडे तब्बल 203 कोटीची येणे बाकी

श्रीराम जोशी/प्रतिनिधी : अहमदनगर महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांच्या थकबाकीने वात आणला आहे. तब्बल 88 हजार 719 थकबाकीदार नगरकरांकडे चक्क

कविता ही हृदयाची भाषा ती जगता आली पाहिजे ः कवी प्रकाश घोडके
शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल | LokNews24
तुमचे आजचे राशीचक्र, गुरुवार १ जुलै २०२१ l पहा LokNews24

श्रीराम जोशी/प्रतिनिधी : अहमदनगर महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांच्या थकबाकीने वात आणला आहे. तब्बल 88 हजार 719 थकबाकीदार नगरकरांकडे चक्क 203 कोटा 46 लाखाची थकबाकी आहे. या वसुलीसाठीचे मनपा प्रशासनाचे नियोजन जवळपास शून्य आहे. अशा स्थितीत ही बाकी तशीच ठेवून मनपा प्रशासनाने मात्र तिप्पट घरपट्टी वाढीचा घाट घातला आहे. मनपातील नवे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरकरांवर नव्या घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून घेण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली की वाईट, हा मुद्दा नेहमीच आळवला जातो. आर्थिक स्थिती बिकट असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. पण दुसरीकडे नव्या पदाधिकार्‍यांच्या दालनांच्या सजावटीसाठी व नूतनीकरणासाठी लाखो रुपयेही उधळले जातात. अर्थात अशी उधळपट्टी नवा प्रशासकीय अधिकारी रुजू झाला की, त्याच्या दालनाच्या नूतनीकरणासाठीही होते. ठेकेदार मंडळी जुनी काही केलेल्या वा न केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी या नूतनीकरणाचा भार उचलतात व पुढे-मागे संधी पाहून या भाराचीही वसुली विविध मार्गाने नियमित बिलांच्या माध्यमांतून करीत असतात, हे मनपात लपून राहिलेले नाही. पण अशा स्थितीत पदाधिकार्‍यांनाही नव्या दालनात बसण्याचा आनंद मिळतो व ठेकेदारांनाही या नूतनीकरण कामाचे पैसे कसे का होईना मिळतात, त्यामुळे त्यांच्यातही आनंद असतो. दुसरीकडे मनपाची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी मात्र कशी वसूल करायची, याचा प्रश्‍न ना प्रशासनाला गांभीर्याने घ्यावासा वाटत नाही वा पदाधिकारी व सत्ताधारीही याकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा स्थितीत कोटीच्या कोटी उड्डाणे थकबाकीने गाठली आहेत.

90 टक्क्यावर थकबाकीदार
महापालिकेला यंदा 228 कोटीच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यात मागील जुनी थकबाकी 182 कोटींची व चालू मागणी 46 कोटींची आहे. यातील आतापर्यंत फक्त 15 कोटी वसुल झाले आहेत. एकूण थकबाकीच्या सुमारे 90 टक्क्याच्यावर म्हणजे 228 कोटीपैकी तब्बल 203 कोटी शहरातील 88 हजारावर थकबाकीदारांकडून येणे बाकी आहे. यात 1 लाखावर थकबाकी असलेले 3 हजारावरजण आहेत. मनपाने केवळ त्यांच्यावर जरी लक्ष केंद्रीत करून त्यांच्याकडील वसुलीला प्राधान्य दिले तरी चक्क 99 कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा होऊ शकतात. पण करायचे कोणी हा प्रश्‍न आहे. वसुली विभागातील बहुतांश कर्मचारी बीएलओ म्हणूनही काम करतात व निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्यात नेहमी व्यस्त असतात. शिवाय, आता नव्याने कोरोना जनजागृतीची कामेही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे वसुलीच्या आढावा बैठकीस वसुली करण्यास येणार्‍या अडचणींचा पाढाच जास्त चर्चेत असतो.

अनेक अडचणी
वसुली कर्मचार्‍यांना अवांतर कामे हा एक मुद्दा असला तरी दुसरीकडे वसुलीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांवर येणारा राजकीय दबाव, हाही दुसरा मुद्दा अडचणीचा आहे. एखाद्याकडे मनपाचे पथक वसुलीला गेले की, त्या थकबाकीदाराकडून एखाद्या नगरसेवकाला वा राजकीय नेत्याला साकडे घातले जाते. तो नेता वा नगरसेवक वसुलीसाठी आलेल्यांना चांगल्या-वाईट भाषेत समजावतो व पथक परत निघून जाते. परिणामी, वसुलीचा आकडा जागच्या जागी स्थिर राहतो. त्यानंतर मनपा प्रशासनाने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करणे व त्यांचा लिलाव करण्याचीही मोहीम हाती घेतली होती. पण या मोहिमांना न्यायालयात आव्हान दिले की बाब न्यायप्रविष्ट होते व वसुली पुन्हा जागच्या जागी ठप्प होते. थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वादन, त्यांच्या नावांचे व त्यांच्याकडे असलेल्या थकबाकी रकमेचे चौका-चौकांतून फ्लेक्स लावणे, वृत्तपत्रांतून थकबाकीदारांची नावे छापणे असे बहुतांश प्रकार मनपाकडून करून झाले आहेत. पण त्याचा फारच कमी फायदा वसुलीला झाला आहे. शास्तीमाफी देण्याचाही प्रशासनाने प्रयोग करून पाहिला आहे, पण त्यालाही कमी प्रतिसाद आहे. अशा सगळ्या माध्यमातून प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी थकबाकीचे कोट्यवधीचे आकडे वर्षानुवर्षापासून कायम आहेत. दरवर्षी चालू बिलाच्या मागणीलाही धुडकावणार्‍या मालमत्ताधारकांकडृून थकबाकीत किमान 10 ते 15 कोटींची भरही पडत आहे. त्यामुळे मनपाच्या थकबाकीची कोटीच्या कोटीची उड्डाणे कायम आहेत.

राजकीय पुढाकार गरजेचा
महापालिकेतील मनपा फंडातून होणारी विकास कामे केवळ पैसे वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार करीत नाहीत. घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न या फंडासाठी वापरले जाते. पण घरपट्टी वसुल होत नसल्याने या फंडात पैसेच येत नाहीत. परिणामी, यातून विकास कामे सोडाच, मनपा नगरसेवकांची मानधनेही वेळेवर मिळत नाहीत. असे वास्तव असल्याने आता नगरमधील सर्वपक्षीयांची राजकीय सत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनपात असल्याने त्यांनी केवळ घरपट्टी व अन्य करांच्या वसुलीला प्राधान्य दिले पाहिजे. नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील थकबाकीदारांकडे स्वतः जाऊन त्यांच्याकडील मनपाचे देणे देण्यास त्यांना भाग पाडले तरच वसुली होऊ शकेल व मनपालाही विकास कामे करण्यास पैसे उपलब्ध होतील. असे झाले नाही तर मग खड्डेमय रस्ते, दोन दिवसाआड येणारे पाणी, आरोग्याची ऐशीतैशी, वीज खांबांच्या खाली पडलेला कचरा, असे दृश्य नगरकरांना सहन करावे लागणार आहे.

असे आहेत मनपाचे थकबाकीदार
पैसे-संख्या-थकबाकी-चालू मागणी-एकूण मागणी
-0 ते 5 हजार-40736- 2 कोटी 46 लाख-7 कोटी 87 लाख-10 कोटी 33 लाख
-5 ते 10 हजार-16399-6कोटी 70 लाख-4 कोटी 99 लाख-11 कोटी 69 लाख
-10 ते 25 हजार-17325-22 कोटी 88 लाख-5 कोटी 26 लाख-28 कोटी 14 लाख
-25 हजार ते 1 लाख-11186-48 कोटी 49 लाख-5 कोटी 65 लाख-54 कोटी 13 लाख
-1 लाख व त्यावरील-3073-91 कोटी 30 लाख-7 कोटी 87 लाख-99 कोटी 17 लाख
-एकूण थकबाकी-88719-171 कोटी 83 लाख-31 कोटी 64 लाख-203 कोटी 46 लाख

COMMENTS