खासदार सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ; आज हिंगोलीत अंत्यसंस्कार; प्रकृतीत सातत्याने चढउतार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ; आज हिंगोलीत अंत्यसंस्कार; प्रकृतीत सातत्याने चढउतार

खासदार राजीव सातव (वय 47) यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. सातव यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती; मात्र फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली.

गुन्हेगारीचा चढता आलेख !
परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!
भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

 पुणे / प्रतिनिधीः खासदार राजीव सातव (वय 47) यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. सातव यांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली होती; मात्र फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 23 दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या सातव यांची प्रकृती मध्यंतरी बिघडली होती. नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.

सातव यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. उद्या सकाळी दहा  वाजता हिंगोली येथे सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्‍वजित कदम यांनी दिली. सातव यांना 19 एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होते. कोविडची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली. 22 एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अहवाल आल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्याची प्रकृती चांगली होती; मात्र 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती; मात्र त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची कररोना चाचणी निगेटिव्ह आली होतीच मात्र त्यांना सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता. दरम्यान, शनिवारी (15 मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला; मात्र ते लवकरच बरे होतील,’ असे म्हटले होते; मात्र त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून सातव यांचे निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केले आहे.

COMMENTS