कोपरगांव / ता.प्रतिनिधी तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी आदि परिसरास सोमवारी रात्री झालेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने अक्षरक्ष: झोडपुन काढले आहे, हात
कोपरगांव / ता.प्रतिनिधी
तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी आदि परिसरास सोमवारी रात्री झालेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने अक्षरक्ष: झोडपुन काढले आहे, हाती आलेली खरीपाची सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, कांदा रोपे आदिसह उस पीक, फळबागा मातीमोल झाले आहे.
शेतांना तळयाचे स्वरूप आले आहे, पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणांत अजुनही साठुन आहे, त्यामुळे खरीपाची पिके सडुन गेली आहे तेंव्हा शासनाने तातडीने याचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोपरगांव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, चालु हंगामात सुरूवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते पण परतीच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या परिसरात दुबार पेरणीचे संकट सहन करूनही शेत-यांनी खरीपाची पिके घेतली, अनेकांनी दाग दागिने गहाण ठेवले पण सोमवारी रात्री हस्त नक्षत्राचा प्रचंड पाउस झाला आणि निसर्गाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला.
शेतात साठलेले पाणी कसे काढायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोकमठाणसह आजुबाजुच्या परिसराला पावसाने झोडपुन काढले. यात शेतक-यांनी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले छत कोलमडुन पडले आहे, काही ठिकाणी रिकाम्या कांदा चाळींचे नुकसान झाले आहे, जनावरांसाठी केलेली चारा पिके व खरीपाची पिके पुर्णपणे सडली आहेत.
त्याची काढणी आता होणार नाही. खरीपाच्या भरवशावर आगामी रब्बीचे नियोजन शेतक-यांनी केले होते पण त्यावरही निसर्गाने वरवंटा फिरविला आहे. अगोदरच समृध्दी महामार्ग या भागातुन गेला आहे, शेतक-यांनी जीवापाड जपलेल्या जमीनी यासाठी संपादित झाल्या, त्यातुन मिळालेल्या पैशावर अन्य शेतीपिके केली पण ती ही पावसाच्या पाण्यांत उध्दवस्त झाली आहे शेतकरी राजाने जगावे कसे असा प्रश्न पडला आहे तेंव्हा शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना भरपाई द्यावी व रब्बी हंगामासाठी भरीव मदत करावी अशी मागणी सभापती संभाजी रक्ताटे यांनी केली आहे
COMMENTS