क्रौर्याची परीसीमा

Homeसंपादकीय

क्रौर्याची परीसीमा

छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा उपद्रव अजूनही आहे.

महागाईचा भडका !
क्लीन चीटच्या चर्चेचे गुर्‍हाळ
विषारी दारुचे बळी

छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंडमध्ये नक्षलवाद्यांचा उपद्रव अजूनही आहे. तेलंगणाने मात्र नक्षलवाद पूर्णतः मोडीत काढला. नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी काही सूचना संबंधित अधिकार्‍यांनी केल्या होत्या; परंतु केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबविताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. पूर्वानुभव तिथे फारसा उपयोग होत नाही. नव्या युक्त्या, प्रयुक्त्या, रणनीती वापरावी लागते; परंतु तसे केले नाही, तर काय होते, याचा अनुभव बिजापूरमधील घटनेमुळे आला आहे. 

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच  नव्हे, 23 जवानांना हौतात्म्य आहे. एक जवान अजून सापडलेला नाही, तर 31 जवान जखमी आहेत. नक्षल्यांनी टेकलगुडा जंगलात शनिवारी हा भीषण हल्ला केला. चकमकीनंतर नक्षल्यांनी जवानांच्या मृतदेहांवरून शस्त्रे लुटली, जवानांचे बूट-कपडेही काढून नेले. नक्षलवाद्यांचा बीमोड केला असे दावे केले जात असताना गेल्या दहा दिवसांत नक्षलवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर हा मोठा दुसरा हल्ला केला. 23 मार्चला नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांची बस उडवण्यात आली. त्यात पाच पोलिसांना हौतात्म्य आले. बदलती रणनीती हे या हल्ल्यामागील कारण आहे. दरवर्षी नक्षली आठ मार्चला हल्ले सुरू करतात. यंदा जानेवारीपासून ते सुरू आहेत. दरवर्षी 2-8 डिसेंबर पीएलजीए सप्ताह म्हणून पाळला जातो. यंदा नक्षली वर्षभर हल्ले करत आहेत. नक्षलींनी जवानांची शस्त्रास्त्रे काढून घेतल्यानंतर मृतदेह एका ठिकाणी ठेवले आहेत, असे प्रथमदर्शनी दिसले. ज्या ठिकाणी जवानांचे मृतदेह होते, त्याच्या जवळच एका खाटेच्या बाजूला आणखी एका जवानाचा मृतदेह पडलेला होता. संपूर्ण भाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्यासारखी स्थिती होती. या  परिसरात 15 ते 20 घरांच्या चार वस्त्या आहेत. यातील तीन वस्त्यांत लोक होते, मात्र एक वस्ती ओस होती. चकमक झाली ते स्थळ पाहता जवान गावात आले, तेव्हा ते तयारीत नसावेत असे जाणवले. उलट नक्षलवादी सज्ज होते. गावात ठिकठिकाणी गोळ्या व रक्ताच्या खुणा होत्या. गावातील शांतता व पूर्ण भागातील चित्र खूपच भीतीदायक होते. सुमारे सातशे सैनिकांना घेरुन नक्षलवाद्यांनी सलग तीन तास त्यांच्यावर गोळीबार केला. 24 तास उलटल्यानंतरदेखील सैनिकांचे मृतदेह घेण्यासाठी रेस्क्यू टीम पोहचली नाही. यावरुन ऑपरेशनल सर्चिंग किती अपयशी ठरले हे दिसत आहे. विशेष म्हणजे हे तेव्हा झाले, जेव्हा या परिसरात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना 20 दिवसांपूर्वीच मिळाली होती. तसेच सुरक्षा दलाचे मोठ-मोठे अधिकारी गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात गस्त घालत आहे. विजापूरमधील ज्या भागात ही घटना घडली तो नक्षललवाद्यांचा फर्स्ट बटालियनचा परिसर आहे. 20 दिवसांपूर्वी युएव्ही छायाचित्रांव्दारे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी असल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेच्या आधी सीआरपीएफचे एडीडीपी ऑपरेशन्स जुल्फिकार हंसमुख, केंद्राचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार आणि सीआरपीएफचे माजी डीजीपी के विजय कुमार आणि विद्यमान आईजी ऑपरेशन्स नलिन प्रभात हे तीनही वरिष्ठ अधिकारी गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने जवानांना हौतात्म्य येत असेल, तर हे त्यांच्या ऑपरेशन प्लॉनिंगवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार आहे. संबंधित परिसरात वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती आणि हालचाल जास्त काळ लपून राहू शकत नाही. नक्षलवाद्यांना त्यांची माहिती मिळणे पूर्णपणे शक्य आहे. याचा अर्थ नक्षलवाद्यांचे खबर्‍यांचे नेटवर्क सुरक्षा यंत्रणेपेक्षाही अधिक प्रभावी आहे, असा होतो.  ऑपरेशनमधे सीआरपीएफ कोब्रा, छत्तीसगड एसटीएफ, डीआरजी आणि नवीन बस्तरिया बटालियन आदी बेस्ट फोर्सेसचा समावेश होता. त्यामुळे हा हल्ला स्थानिक नसून वरच्या स्तरावरील नियोजनात त्रुटी दर्शवणारा आहे. अशा ऑपरेशनमध्ये पाच वेगवेगळ्या सैन्य दलांच्या उपस्थितीत कमांड आणि कंट्रोल करणे हे एक मोठे आव्हान असते. गोळीबार झाल्यास, सर्वजण त्यांच्या प्रशिक्षण आणि डिझाइननुसार कारवाई करतात. त्यामुळे एकसारखेपणा अस्तित्वात राहत नाही. याऊलट नक्षलवाद्यांच्या कृतीत एकसारखेपणा असतो. छत्तीसगढमधील बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि भारतीय जवानांची चकमक झाली. यात 15 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले असले, तरी या चकमकीत 23 जवानांना हौतात्म्य आले. हा भारतीय सुरक्षादलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दंडकारण्यातील या भागात नक्षलवाद्यांची पीएलजी बटालियन 1 ही कार्यरत आहे. ही बटालियन अत्यंत सामर्थ्यशाली असल्याचे सांगितले जाते. बिजापूर आणि आसपासच्या परिसरात त्यांची प्रचंड दहशत आहे. हा प्रभाव मोडून काढण्यासाठीच डीआरजी, एसटीएफ कोबरा आणि सीआरपीएफ यांच्याकडून ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबवली जात होती. तीन एप्रिलला सुरक्षादलांना बिजापुर-सुकमा सीमारेषेवर असणार्‍या तर्रेम डोंगराळ भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सुरक्षादलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या. तीन एप्रिलला दुपारी 12 वाजता जोनागुंडम आणि टिकलागुंडम या परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षादलांचे जवान आमनेसामने आले. नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा आणि त्याचे साथीदार बिजापूरच्या जंगलात डेरा टाकून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. हे नक्षलवादी घात लावून हल्ला करु शकतात, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला होता, तरीही त्याबाबत पुरेशी दक्षता बाळगली गेली नाही. 

COMMENTS