अहमदनगर-प्रतिीनिधी-कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीबांना रोजगार नसल्याने त्यांना रेशनद्वारे देण्यासाठीचे धान्य नगरमध्ये आणून त्याचे पीठ करून विकण्याचा प्रकार कोतवाली पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे.
अहमदनगर-प्रतिीनिधी-कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीबांना रोजगार नसल्याने त्यांना रेशनद्वारे देण्यासाठीचे धान्य नगरमध्ये आणून त्याचे पीठ करून विकण्याचा प्रकार कोतवाली पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे. हरियाणा व मध्यप्रदेशमधील हे धान्य असल्याने देशभरातील धान्य माफियांची साखळी यातून उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींना 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात शनिवारी कोतवाली पोलिस व जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने सुरेश रासकर यांच्या दुकान व गोदामवर छापा मारून 41 लाख रुपयांचा काळ्याबाजारात नेण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला रेशनचा गहू व तांदूळ जप्त केला आहे. हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील हे रेशनचे धान्य आहे. बहुदा कोरोना काळात तेथे गरीबांना देण्यासाठीचे हे धान्य असावे, असा संशय आहे व त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी पावणे आठ लाखाचे धान्य तसेच 3 ट्रकरसह तीन चार चाकी गाड्याही जप्त करून मार्केटयार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व केडगाव इंडस्ट्रीजमध्ये असणार्या गोडावूनला सील ठोकले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश श्रीनिवास झंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, सुभाष पागिरे, सागर अशोक नांगरे, सुरेश रासकर, भगवान छत्तीसे, आदिनाथ चव्हाण या आठजणांना अटक केली असून या प्रकरणामधील संग्राम रासकर, आसाराम रासकर हे दोघे जण फरार आहे. त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या काळात जे गहू व तांदूळ विक्रीसाठी तसेच गरीबांना वाटण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, त्यातीलच हा धान्यसाठा असल्याचे सांगण्यात येते. मार्केट यार्ड परिसरामध्ये सुरेश रासकर यांची सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडिंग कंपनी या नावाची फर्म आहे तर त्यांचे धान्य ठेवण्यासाठीचे गोडावून हे केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आहे. केडगावच्या गोदामाजवळ फ्लोअर मीलही असून, येथे धान्याचे पीठ करण्याचे काम केले जाते. याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रासकर यांच्या दुकानावर व गोडावून वर छापा टाकून 41 लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर शहरातील अनेक रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. रेशनिंगचा माल योग्य पद्धतीने वितरित होतो की नाही, याबाबत सुद्धा आता शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या रडावर अजून कोण कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
पकडलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी युक्तिवाद केला. रासकर यांच्याकडे सापडलेल्या गहू व तांदूळ यांच्या गोण्यांची तपासणी पोलिसांना करायची आहे, मध्यप्रदेश व हरियाणा या ठिकाणाहून त्यांनी हा माल आणला असल्याचे सांगितले असल्याने तो नेमका तेथूनच आणला आहे का याची खातरजमा करायची आहे तसेच माल कुठून व कसा आणला तसेच कोणाला विकला गेला याचाही पोलिसांना तपास करायचा आहे, या मुद्यांसह या प्रकरणांमध्ये अन्य कोणा-कोणाचा समावेश आहे याची सुद्धा पोलिसांना माहिती घ्यायची आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे यांच्याकडे असणारे बिल बुक तसेच यांची रोजमेळची वही पोलिसांना हस्तगत करायची आहे, संगणकावर असलेल्या धान्य नोंदी केल्या आहेत की नाहीत याचा पोलिसांना छडा लावायचा असल्याने आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या आठ आरोपींना दिनांक 24 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
COMMENTS