कोरोनाविरुद्ध महापालिकेची जय्यत तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाविरुद्ध महापालिकेची जय्यत तयारी

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने राज्य सरकारने मुंबईसह राज्यात पुन्हा टाळेबंदी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महिलांच्या कौतुकाने अजितदादा झाले भावुक… डोळ्यात आले अश्रू…
भीषण अपघात,पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू | LOKNews24
अश्‍वमेधच्या अगदी स्वस्तात मिळणार आयुर्वेदिक औषधी ः डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे

मुंबई/प्रतिनिधीः कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने राज्य सरकारने मुंबईसह राज्यात पुन्हा टाळेबंदी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने रुग्णालये आणि कोरोना केंद्रांतील खाटा वाढवणे, नोडल अधिकार्‍यांची नेमणूक, पंचतारांकित हॉटेलातील खोल्या ताब्यात घेण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही खास रणनीती आखली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची खाटा मिळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. 

लक्षणे नसलेले रूग्ण खाटा अडवत असल्याचे आढळून आल्याने योग्य रुग्णांना खाटा मिळवून देण्यासाठी कठोर कार्यपद्धती अंमलात आणली जाणार आहे. प्रत्येक वार्डसाठी दोन नोडल अधिकारी नेमण्यात येणार असून हे अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत काम पाहणार आहेत. त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत रुग्णांना खाटांसाठी वणवण करावी लागणार नाही. कोरोना रुग्णालये आणि कोरोना केंद्र या दोन्ही ठिकाणी हे अधिकारी समन्वय साधतील.

महापालिकेने मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 325 अतिरिक्त आयसीयू खाटा वाढवल्या आहेत. त्यामुळे आयसीयू खाटांची संख्या दोन हजार 466 वर गेली आहे, तर आतापर्यंत 19,151 खाटांचे वाटप डॅशबोर्डवरून झाले आहे. 141 रुग्णालयांतील 3,777 खाटा रिक्त आहेत. कोरोना केंद्रांमध्ये येत्या सात दिवसांत 125 आयसीयूसह 1100 अतिरिक्त खाटा उपलब्ध होतील. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून यामध्ये दोन हजार खाटा उपलब्ध होतील. यातील 70 टक्के खाटा ऑक्सिजन आणि 200 खाटा आयसीयूच्या असतील.

खासगी प्रयोगशाळांना 24 तासांच्या आत चाचणी देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णांवर तातडीने औषधोपचार करता येतील. तसेच आवश्यक वाटल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचे याचीही वर्गवारी करणे शक्य होणार आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्यांना उपचाराची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची पंचतारांकित हॉटेलात व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये कोविड सेंटरप्रमाणेच प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील. ज्यांना ज्या हॉटेलमध्ये राहणे परवडेल, त्यांनी तिथे राहावे, अशी ही व्यवस्था आहे.

“वाढत्या रुग्णसंख्येची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने या उपाययोजना वाढवल्या आहेत. पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असून लवकरच कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रणात आणण्यात यश मिळेल, असा विश्‍वास आहे.

-इकबालसिंह चहल, पालिका आयुक्त

“कोरोना संसर्ग वाढत असताना अनेक रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळवण्यात अडचणी येत आहेत. काही खासगी रुग्णालयांमध्ये खाटा अडवून ठेवल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे.

-किशोरी पेडणेकर, महापौर

COMMENTS