सध्या देशभरात महागाईच्या नावाने सर्वदूर शिमगा सुरू आहे.पेट्रोल डिझेलच्या किंमतीने शंभरी केंव्हाच पार केली आहे.अशाही परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था लटपट
सध्या देशभरात महागाईच्या नावाने सर्वदूर शिमगा सुरू आहे.पेट्रोल डिझेलच्या किंमतीने शंभरी केंव्हाच पार केली आहे.अशाही परिस्थितीत आपली अर्थव्यवस्था लटपटत आहे.आपली अर्थव्यवस्था एव्हढ्या डबघाईला का गेली? सरकारचे धोरण कारणीभूत आहे का? एखादी विदेशी ताकद भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठली आहे का? महागाई सतत का वाढत आहे.? या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेचा रूपयाच्या मुल्यावर कुठला परिणाम होतो? त्याचा फायदा नेमका कुणाला होऊ शकतो? अशा काही प्रश्नांच्या उत्तरांमधून भारतीय अर्थव्यवस्थेचे नेमके चित्र आणि त्यामागचे गुन्हेगार प्रकाशात अल्प प्रमाणात का होईना येण्यास मदत होऊ शकते.
कुठल्याही देशाची अर्थव्यवस्थेचा थेट संबंध त्या देशाच्या विकास दराशी लावला जातो,या नियमाचा विचार केल्यास पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या भारताचा विकास दर म्हणजे जीडीपी उणे आहे.याचाच अर्थ भारताची अर्थव्यवस्था लटपटत आहे असा होतो.विकास दर त्या देशाचे उत्पादन आणि उत्पादनाची विक्री म्हणजे देशातील जनतेच्या खरेदी क्षमतेवर ठरतो.या मुद्यावर भारत पुर्णतः अपयशी ठरल्याने विकास दर कोसळला आणि अर्थव्यवस्था डळमळू लागली.अर्थव्यवस्थेवर इन्फ्लेमेशन रेट महागाई निर्देशांकाचाही परिणाम होतो.महागाई निर्देशांक वाढला म्हणजे महागाई वाढू लागली त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात,कारण महागाईचा थेट संबंध मागणी पुरवठा प्रमाणात होणारा चढ उतार,उत्पादन खर्चात होणारा चढ उतार आणि चलनाचे मुल्य घसरणे याच्याशी असतो.
भारतात सध्या वाढत असलेल्या महागाईशी डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा संबंध नाही.तर उत्पादन खर्चात सातत्याने होत असलेली वाढ हे विद्यमान महागाई वाढण्याचे प्रमुख कारण आहे. उत्पादन खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने सांगीतले जात असून त्याचे खापर जिएसटीवर फोडले जात आहे.केंद्र सरकाराने जिएसटी लागू केल्यानंतर या देशात महागाई अचानक २८ टक्यांनी वाढली.तत्पुर्वी चार टक्के एव्हढा साधारण भरला जात होता,त्यातही अनेक पळवाटा शोधून ते चार टक्केही वाचवले जात होते.याचाच अर्थ २८ टक्यांनी महागाई केवळ जिएसटीने वाढवली. महागाई वाढण्यास आणखी एक घटक मुख्यतः कारणीभूत ठरला तो म्हणजे पेट्रोल डिझेलमध्ये रोज होत असलेली वाढ.इंधन दरवाढीमुळे प्लास्टीक उद्योगावर दुरगामी परिणाम होत आहेत.प्लास्टीक उद्योगात पेट्रोल महत्वाचा घटक आहे.पेट्रोलच्या किमती वाढल्याने त्याचा प्लास्टीक उद्योगाला फटका बसणे स्वाभाविक आहे,सार्वजनिक खासगी वाहतूकही डिझेल दरवाढीमुळे बाधीत झाली आहे,या दरवाढीचा एकूण परिणाम देशातील अन्य सेवा आणि उत्पादन महाग होण्यात झाले आहे.या एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन रिझर्व्ह बँकेनेही केंद्र सरकारला पेट्रोल डिझेल दरवाढीला अंकूश लावण्यासाठी सुचीत केले आहे.हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. या वाढत असलेल्या महागाईमुळेरूपयाचेही रोज अवमुल्यन होत असल्याने विदेशी बाजारात भारताची पत ढासळू लागली आहे.उत्पादन खर्च वाढल्याने वस्तूची किंमत वाढली,त्याचा परिणाम निर्यातीवर होणे क्रमप्राप्त आहे.भारतातून निर्यात होणाऱ्या मालाची किंमत वाढली तर आयात करणारे देश भारताला पर्याय शोधून दुसऱ्या देशातून आयात करणार हे निर्विवाद.याचाच दुसरा अर्थ असा की भारताची निर्यात थांबली की विदेशी चलन भारतात येणे थांबणार.विदेशी चलन नाही तर भारताची आयातही थांबणार.रूपयाचे मुल्य घसरले की त्याचा फायदा बहुराष्ट्रीय कंपन्या आयता उचलणार.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला जे हवे आहे अगदी त्याच पाऊलवाटेने भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास सध्या सुरू आहे. एकूणच भारतात महागाई,उत्पादन खर्चात झलेली वाढ रूपयांचे अवमुल्यन यामुळे कमकूवत झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे छोटे छोटे स्वदेशी उद्योग मोडकळीस आले आहेत,बहुराष्ट्रीय कंपनीची गुंतवणूक वाढू लागली आहे.यातून कुठला अर्थ काढायचा? कुण्या एके काळी ब्रिटनलाही मागे टाकून जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ही धुळधाण कुणी केली? कुणाच्या हितासाठी हा प्रपंच मांडला गेला? या प्रश्नांची उत्तरे भारातीयांनी स्वतःच शोधावीत.
COMMENTS