केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी  ; ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय होत नसल्याने उद्योजक नाराज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी ; ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय होत नसल्याने उद्योजक नाराज

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला लागणार्‍या ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे, तरीही उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा न वाढविल्यामुळे उद्योग मेटाकुटीला आले आहेत.

शिवसेना व भाजप आमने-सामने
‘मेफेड्रोन’ प्रकरणातील पीएसआयचे निलंबन
‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल’ : नाना पटोले | LOKNews24

पुणे / प्रतिनिधी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला लागणार्‍या ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे, तरीही उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा न वाढविल्यामुळे उद्योग मेटाकुटीला आले आहेत. उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे; मात्र राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाकडून अद्याप त्याबाबत प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे 20 टक्के ऑक्सिजनवर किती दिवस काम करायचे, असा प्रश्‍न उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्य सरकारने एप्रिलपासून उद्योगांचा ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्राकडे वळविला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आणि ऑक्सिजन शिल्लक राहू लागल्यामुळे राज्य सरकारने 20 टक्के ऑक्सिजन उद्योगांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय तीन जून रोजी घेतला; मात्र त्यानंतरही पुणे आणि परिसरातील रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे उद्योगांसाठीच्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, अशी उद्योजकांची अपेक्षा होती; परंतु अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. या बाबत उद्योजकांनी विभागीय उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, अन्न व औषध प्रशासनातील सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीही या बाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मार्फत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला; परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

प्लेट कटिंग, लेझर कटिंग, प्रोफाईल कटिंग, फॅब्रिकेशन, मटेरिअल हॅन्डलिंग, स्पेशल पर्पज मशिन आदींच्या कामांसाठी उद्योगांना रोज ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजनला पर्याय म्हणून एअर कॉम्प्रेसरचा वापर काही ठिकाणी होऊ लागला, तरी त्याला मर्यादा आहेत. परिणामी पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ लागला आहे. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे उद्योगांमध्ये ऑर्डर वाढू लागल्या आहेत. तसेच, मनुष्यबळही पुरेसे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे कामांना वेग येऊ लागला आहे; परंतु ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे उद्योगांना अडचणी येऊ लागल्या आहेत. पुरेसे काम नसल्यामुळे काही कंपन्यांत कामगारांना बसवून ठेवावे लागत असल्याचेही चित्र आहे.

COMMENTS