गोखलेचा राष्ट्रद्रोह

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गोखलेचा राष्ट्रद्रोह

भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक असल्याची दर्पोक्ती न(क)टी कंगना राणावतने केल्यानंतर तिचीच री ओढत आपणही त्याच वंशावळीतील असल्याचा प्रत्यय अभिनेते

नागपाड्यातून आठ बाल कामगारांची सुटका
भारतराष्ट्रसमिती पक्षातर्फे देवळालीत मोर्चेबांधणी 
मोबाईल मधील गेममुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू | LOKNews24

भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक असल्याची दर्पोक्ती न(क)टी कंगना राणावतने केल्यानंतर तिचीच री ओढत आपणही त्याच वंशावळीतील असल्याचा प्रत्यय अभिनेते विक्रम गोखले यांनी दिला. कंगना राणावत जे म्हणाली आहे ते खरे आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेले आहे यावर मी सहमत असल्याचे वक्तव्य करून, कंगना पाठोपाठ गोखलेनी एकप्रकारचा राष्ट्रद्रोहच केला. अशा प्रवृत्तींना वेसन घालण्याची गरज आहे.
बेताल वक्तव्याने कधी नव्हे ते आता उंच टोक गाठले असून त्याला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे. बेताल वक्तव्य करून आपल्या अपरिपक्व बुध्दीमत्तेचे दर्शन घडवणारे थोडेथोडके नसून जास्तच आहे. भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून तर या नट-नटयांच्या वक्तव्यांना अच्छे दिन आले आहे. त्यामुळेच त्यांचे बेताल वक्तव्ये सहज खपत आहे, शिवाय कारवाईचा कसलाही बडगा नाही. म्हणूनच दोन- चार दिवस झाले की एक तरी नट-नटी, राजकीय नेता बरळणारच. त्याच पंरपरेतील कंगना आणि गोखले यांचे वक्तव्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत एक सार्वभौम संपन्न देश आहे. तो कुणाच्या अधिपत्याखाली नसून, तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. या देशाचा कायदा म्हणून आपण संविधानाचा स्वीकार केला आहे. मात्र देशाच्या संविधानाला आणि सार्वभौमत्वाला छेद देण्याचे वक्तव्य करून, एकप्रकारची अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. त्यातूनच कंगनाचे आणि गोखलेचे वक्तव्य आल्याचे दिसून येते. गोखले किंवा कंगना आताच का, बरळायला लागले. 2014 पूर्वी त्यांनी असे वक्तव्य का केले नाही. याचे कारण समजून घ्यावे लागेल. केंद्रात भाजपचे सरकार येऊन सहा-साडेसहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र या सहा साडेसहा वर्षांत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जितका विरोधकांनी केला नसेल, तितका प्रयत्न स्वपक्षीयांनी किंवा त्यांचे समर्थन करणार्‍यांनी केला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढयाचा इतिहास तेजस्वी आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आपले बलिदान दिले. तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र या स्वातंत्र्यलढयात कंगनाची, किंवा गोखलेची वंशावळ कुठे होती, याचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. स्वतंत्र देशात सर्व सुख, सोयी, सुविधा उपभोगायची आणि या स्वातंत्र्याला भीक मागून मिळाल्याचे वक्तव्य करायचे. कंगनाच्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भाजपने तरी पुढे यायचे होते. मात्र भाजपमधील एकही प्रखर राष्ट्रभक्त तिच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुढे आला नाही. तोच कित्ता गोखलेच्या बाबतीत देखील लागू पडेल. मात्र अशा प्रवृत्तींना कुठेतरी ठेचण्याची गरज आहे. आज कंगना झाली, उद्या गोखले झाला, परवा कुणीतरी उपटसुंभ पुन्हा याला समर्थन देईल. त्यामुळे ही प्रवृत्ती फोफावत जाते. कंगना, गोखले यांना देशात लोकशाही नको आहे. वास्तविक कंगना, गोखले हे लोकशाही आणि भारतीय संविधानाला मानत नाही, असे त्यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट दिसून येत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्यांचा अधिकार आहे. त्यामुळे साहजिकच टीका टिपण्णी ही होतच राहणांर. मात्र देशाच्या सार्वभौमत्वाला आणि स्वातंत्र्याला थेट हात घालणे म्हणजे हा राष्ट्रद्रोहच. ज्यांच्या धमण्यातील रक्तात, हुकूमशाही, संरजामशाही आहे, त्यांना या देशातील स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाही साहाजिकच खुपणार यात शंका नाही. त्यामुळेच त्यांना देश 2014 पर्यंत पारतंत्र्यात होता असे वाटते. तुमचे भांडण काँगे्रससोबत असेल, तर त्यांच्यासोबत खुशाल लढा, भांडा. मात्र त्यात देशातील एकात्मतेला ओेढू नका. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, विविधतेत ही एकता टिकवून ठेवणारे संविधान म्हणून भारतीय संविधानाचा नेहमीच गौरव केलास जातो. या देशात सर्वच धर्मांना आपले विचार व उपासना करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान बहाल करते, त्याच संविधानांच्या आधारे मोदी सरकार देशाचा गाडा हाकत आहे. आणि त्याच संविधानाच्या आधारावर नेहरूजी आणि लालबहादूर शास्त्री देखील गाडा हाकत होते. असे असतांना, देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते, असे वक्तव्य करणे मुर्खाच्या नंदनवनात फिरण्यासारखे आहे. त्यामुळे या नट-नटयांनी आता तरी देशभिमानाशी गद्दारी न करता, देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

COMMENTS