कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा संस्थापक पॅनेलला पाठिंबा

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेस चे युवक नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी बहुतांशी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

नगरमधून तीन अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता
माजलगाव शहर पोलिसांनी केला खुनाचा उलगडा
IPL 2023 चा 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे

इस्लामपूर / प्रतिनिधी : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेस चे युवक नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी बहुतांशी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

गेली अनेक दिवस कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहित्यांच्या आघाडीच्या चर्चा चालू होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. उदयसिंह पाटील यासह नेते मंडळींनी प्रयत्न केले होते. आघाडीच्या चर्चा थांबल्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत  कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी कॉग्रेसचे युवा नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील व कॉग्रेस पक्षाच्या काही पदाधिकर्‍यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत बहुतांशी कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर यावेळी बोलताना उदयसिंह पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते व ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी सल्ला मसलत करून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे जाहीर केले होते.

त्याप्रमाणे अ‍ॅड पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी कृष्णा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठींबा जाहीर करून तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

गेली अनेक दिवस कृष्णेच्या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला राहणार याची उत्सुकता लागली होती. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कृष्णेच्या रणांगणात सर्वांच्याच नजरा  कॉग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.

माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पश्‍चात होणार्‍या या कृष्णेच्या निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्या मदतीला काँग्रेसचे अ‍ॅड. उदयसिंह पाटील ठाम उभे राहिल्याने निवडणुकीत संस्थापक पॅनेलची निश्‍चित ताकद वाढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

आज दुपारी 1 वाजल्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी अ‍ॅड. उदयसिंह पाटील व प्रा. काटकर यांच्यामध्ये कृष्णाच्या निवडणूकीत कोणला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून खलबत चालले होते. याप्रसंगी मलकापूर पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व कराड पालिकेचे नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. अखेर आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली. मात्र, अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर करून टाकल्याने कृष्णेच्या निवडणूकीची रंगत वाढविली आहे.

COMMENTS