अहमदनगर/प्रतिनिधी- सध्याच्या युगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे अनुभव येतात. अशीच एक घटना कोतवाली पोलिस ठाण्यात घडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुतण्
अहमदनगर/प्रतिनिधी- सध्याच्या युगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे अनुभव येतात. अशीच एक घटना कोतवाली पोलिस ठाण्यात घडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुतण्याने केलेली दुचाकीची चोरी काकाला सहन न झाल्याने काकाने थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना पुतण्याचे कुकर्म सांगितले व चोरी झालेली गाडी मूळ मालकाला मिळवून दिली.
मळकी व फाटकी वेशभूषा असलेला पांढरी दाढी व पांढरे वाढलेले केस त्यावर मळके उपरणे गुंडाळलेले अशा रूपातील सुमारे 65 ते 70 वयोगटातील वृद्ध घाईघाईत पोलिस ठाण्यात आला आणि पोलिस अंमलदार यांना म्हणाला, साहेब लवकर चला. त्याने एक गाडी चोरुन आणली. लवकर चला नाहीतर तो निघून जाईल. या प्रकाराने पोलिसांनी त्याची विचारपूस केली. पण तो पोलिसांना बरोबर चलण्याची घाई करीत होता. पोलिसांनी त्याला मोठ्या आवाजात नाव-गाव विचारले व गाडी कोणी चोरली असे विचारले, त्यावर त्या वृद्धाने माझ्या पुतण्याने मोटारसायकल चोरली. लवकर चला, तो ती गाडी तोडून टाकील, असे म्हटले. हे ऐकताच पोलिस क्षणभर शांत झाले. तुझा पुतण्या का ? व्हय, माझा सख्खा पुतण्या, माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा त्याने चोरली. त्याला तात्या म्हणत्यात, असे तो म्हणताच पोलिसांनी त्या वृद्धाबरोबर दोन पोलिसांना पाठवले अन् अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पोलिस एक मोटारसायकल घेवून आले. त्या पोलिसांनी सांगितले, या म्हातार्याच्या पुतण्याने ही गाडी चोरून आणली. अन् गाडीची खोपडी फोडत असतानाच पोलीस आलेले पाहताच तो पळून गेला.
पोलिसांनी ती मोटरसायकल ताब्यात घेतली व चोरणार्याची चौकशी केली असता तो सराईत गुन्हेगार व अट्टल दारूडा असल्याची माहिती मिळाली. चोरीची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या समाधानाने तो वृद्ध पोलिस ठाण्यातून निघून गेला. त्यानंतर सुमारे एक तासानंतर ज्यांची मोटरसायकल चोरीस गेली, ते तरुण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद द्यायला आले. परंतु तेथे मोटारसायकल पाहतात त्यांना कमालीचा आनंद झाला. पोलिसांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली व त्या वृद्ध काकांचे आभार माना असे म्हणून त्यांना चोरीची फिर्याद देण्याविषयी सांगितले. परंतु त्या तरुणांनीही मोठ्या मनाने आमची गाडी आम्हाला मिळाली. आता आमची तक्रार नाही, असे म्हणून पोलिसांचे व विशेषतः त्या वृद्ध काकांचे आभार मानून गाडी ताब्यात घेऊन निघून गेले.
COMMENTS