काँग्रेसचे मुक्कामी आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित  ; आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनपा ऑक्सिजन बेड सुविधा करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे मुक्कामी आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित ; आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनपा ऑक्सिजन बेड सुविधा करणार

महापालिकेने नगर शहरात ऑक्सिजन सुविधेसह 1 हजार रुग्ण क्षमतेचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेसने मनपात केलेले मुक्कामी आंदोलन अखेर शुक्रवारी स्थगित केले.

अजित पवारांनी नगरला येऊन काय केले ? गडकरींनाच फोन केला ना ?
राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे : शरद पवार l DAINIK LOKMNTHAN
अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेने नगर शहरात ऑक्सिजन सुविधेसह 1 हजार रुग्ण क्षमतेचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेसने मनपात केलेले मुक्कामी आंदोलन अखेर शुक्रवारी स्थगित केले. मनपाद्वारे ऑक्सिजन बेड सुविधा देण्याची ग्वाही आंदोलकांना दिली गेली. दरम्यान, मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफख़ाना पोलिसांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

    याबाबतची माहिती अशी की, मनपाद्वारे कोविड सेंटर सुरू करण्याच्या मागणीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या होत्या व त्यानुसार शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी आयुक्तांसमवेत बैठकीत चर्चा केली तेव्हा मनपा प्रशासनाद्वारे अशा कोविड सेंटरचा प्रस्ताव तयार केला जाईल व मनपाच्या महासभेत तो मंजूर केला जाईल, अशी ग्वाही दिली गेली होती. पण त्यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनी घुमजाव करीत असा कोणताही प्रस्ताव आमच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच्या निषेधार्थ काळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिवसभर मनपात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यातून तोडगा न निघाल्याने आंदोलक गुरुवारी रात्री मनपातच मुक्कामी होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या आंदोलनातून मार्ग निघाला व ते स्थगित करण्यात आले.

आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित : काळे

मनपा आयुक्तांच्या ठोस आश्‍वासनानंतर काँग्रेसचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांसमवेत काँग्रेस शिष्टमंडळाची जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसच्यावतीने महापालिकेला एकाच वेळी, एकाच ठिकाणी कोविड सेंटर मोठ्या प्रमाणावर सुरू करणे शक्य नसेल तर मनपाची आत्ताच्या स्थितीत सुरू असणार्‍या कोविड केअर सेंटरमधील सध्या रिकामे असणारे बेड हे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतरीत करण्यात यावे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत न्यावी, असा पर्याय सुचविण्यात आला. यावर आयुक्तांनी याबाबतीमध्ये ठोस आश्‍वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे की, महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन बेड नागरिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलू. आयुक्तांच्या या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करत असल्याचे काळे यांनी सांगितले.

आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल

महापालिकेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष काळे यांनी गुरुवारी केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपायुक्त यशवंत डांगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोविड-19 माहीत असताना मनपा दालनात बेकायदेशीर जमाव जमवून ठिय्या आंदोलन करून घोषणा दिल्या व जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी काळे यांच्यासह मनोज गुंदेचा, शरद गिते, खलील चौधरी, अनिस चुडीवाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तेथेच जेवण व झोपही

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मागणीसाठी काळेंसह काँग्रेस पदाधिकार्‍यांनी गुरुवारी रात्री मनपात आयुक्तांच्याच दालनासमोर चटई अंथरूण मुक्काम केला. काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यात सहभागी झाले होते. आंदोलकांना कुणी झोपण्यासाठी चटई, पांघरून आणून दिले तर कोणी स्वतःच्या घरून जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी आणून दिले. रात्री काळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती दिली व शहराचे आ.संग्राम जगताप यांचे नाव न घेता शहरातील परिस्थितीला तेच जबाबदार असल्याचा आरोप केला.

राठोड-बोराटेंकडून दख़ल

गुरुवारी रात्री उशिरा युवासेनेचे नेते विक्रम अनिल राठोड यांनी मनोज गुंदेचा यांच्या दूरध्वनीवरून किरण काळे यांच्याशी संवाद साधला. तुमच्या आंदोलनाला पाहून मला माझ्या दिवंगत वडिलांची-हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड यांची आठवण झाली. तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी सर्वसामान्य नगरकरांसाठी (स्व.)भैय्यांप्रमाणेच रस्त्यावर उतरत आहात. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे यावेळी राठोड यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनीही काळे यांना फोन करत आपला लढा नगरकरांच्या रास्त प्रश्‍नांवर असून मनपाला वठणीवर आणण्यासाठी आपण उचललेले पाऊल योग्यच असल्याचे सांगितले.

COMMENTS