एसटीचा तिढा सुटणार का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

एसटीचा तिढा सुटणार का ?

मुंबई न्यायालयाचा मनाई आदेश, सरकारने स्थापन केलेली समिती आणि एसटी महामंडळाने न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतरही एसटी कामगार मागे हटले नाहीत. द

हकनाक बळी !
ओबीसी नेत्यांचे खून करण्यामागे आर‌एस‌एस का?
लोकशाहीचा उत्सव आणि मूल्ये

मुंबई न्यायालयाचा मनाई आदेश, सरकारने स्थापन केलेली समिती आणि एसटी महामंडळाने न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतरही एसटी कामगार मागे हटले नाहीत. दिवाळी सुरू होण्यापूर्वी सुरु झालेला कामगारांचा संप अद्यापही सुरू आहे. दिवसेंदिवस हा प्रश्‍न जटील होत चालला असून कामगारांच्या आत्महत्येचे लोन काही करता कमी होईना. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संपकरी कामगार व संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार कामगारांना दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, ठाकरे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या सरकारने यावर काहीही उपाययोजना केली नसल्याने एसटीचे कामगार आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणीही नेता असला तरीही त्याच्या विनंतीला मान देण्यास नकार दिला आहे.
एसटी कर्मचार्‍यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा, यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. आपला प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकार काय काय पावले उचलत आहे हे उच्च न्यायालयासमोर मांडले आहे. त्यावर न्यायालयही समाधानी झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून काम सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. दोन वर्षापासून विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एसटी कामगारांना विनंती करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपसह विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. ’राजकीय पक्षांनी एसटी कर्मचार्‍यांना चिथावणी देऊन आंदोलनास भाग पाडले. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर करून आपल्या राजकीय पोळ्या भाजू नयेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही हे लक्षात घ्यावे, असे स्पष्ट केले आहे. एसटी कामगारांच्या संपाच्या प्रश्‍नावर महामंडळाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कामगार संघटनेला दिले आहेत. संपकर्‍यांविरोधात एसटी महामंडळाची कोर्टात याचिका दाखल झाली. महामंडळाच्या अवमान याचिकेवर सुनावणीही झाली. हायकोर्टाने प्रतिवादींना उत्तर दाखल करण्याचा आदेशही दिला. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी दिवाळीच्या आधीपासून पुकारलेला संप न्यायालयाने बंदी आदेश जारी केला होता. मात्र, राज्य सरकारने कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करूनही संपकरी कामगार मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना, या संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि तब्बल 340 जणांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. सर्व कामगारांनी औद्योगिक न्यायालयाचा 29 ऑक्टोंबरचा आदेश आणि मुंबई हायकोर्टाचे 3 नोव्हेंबर व 8 नोव्हेंबरचे दोन्ही आदेशाचा भंग करून संप सुरुच ठेवला आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती महामंडळाचे अ‍ॅड. जी. एस. हेगडे यांनी केली आहे. कामगारांच्या संपाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कोल्हापूर विभागातील एका कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. कोल्हापूर बस स्थानकात गगनबावडा आगारातील कर्मचारी एसटी कामगारांचा संप अद्याप सुरूच असून कोल्हापुरात कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक करू लागले आहेत. मात्र, आताचे विरोधक सत्तेत होते त्यावेळी त्यांनी काय केले असा सवाल जनता विचारू लागली आहे. राज्यातील एस.टी. कर्मचार्‍यांचे गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी दोन दिवसापासून संपात उतरले आहेत. सकाळी कोल्हापूर बस स्थानकात गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद कांबळे यांने रुमालाचा वापर करत गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सरकार कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करत नसल्याने निराश झालेल्या कांबळे याने हे पाऊल उचलले. एकीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संप मागे घेण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे संपावर कर्मचारी संघटना ठाम आहेत. यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कामगारांच्या प्रश्‍नापेक्षा राजकारण जास्त होवू लागल्याने कामगार संघटना कामगारांचे मनोबल वाढविण्यापेक्षा कामगारांचे खच्चीकरण करू लागल्या आहेत.

COMMENTS