नगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटल या धर्मदाय दवाखान्यातून मुदतबाह्य झालेल्या औषधांची विक्री होत असल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडियातून खूप व्हायरल झाला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- नगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटल या धर्मदाय दवाखान्यातून मुदतबाह्य झालेल्या औषधांची विक्री होत असल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडियातून खूप व्हायरल झाला आहे. या व्हीडीओबाबत आनंदऋषीजी हॉस्पिटलने खुलासाही केला आहे. पण एखाद्या चुकीच्या गोष्टीची संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याऐवजी त्या चुकीचा व्हिडीओ करून तो सोशल मिडियात व्हायरल करण्याच्या या प्रकाराने नगरच्या वैद्यकीय विश्वात मागील दोन दिवसांपासून ख़ळबळ उडाली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने तसेच सिव्हील हॉस्पिटल व मनपा आरोग्य विभागाने या व्हीडीओची दखल घेऊन त्यातील सत्यता तपासली पाहिजे व या विषयाबाबत भूमिकाही स्पष्ट करण्याची गरज आहे.
याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारपासूनच नगर शहरात विविध व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये तो प्रसिद्ध व्हीडीओ व्हायरल होत आहे. यात एकजण रेमडॅक इंजेक्शनच्या तारखेवर चिकटवलेले कागद काढताना दिसत आहे व ते काढल्यावर संबंधित इंजेक्शन खोक्यावरील एक्सपायरी डेट व किंमत काळ्या रंगाने खोडलेले दाखवून त्यावर नवी तारीख व किंमत असल्याचा कागद लावल्याचे सांगत आहे. यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांचे नाव दिलेल्या या धर्मादाय दवाखान्यातल्या मेडिकल शॉपीमधून या नातेवाईकांनी ‘रेमडॅक’ नावाचे औषध विकत घेतले. या औषधाच्या रॅपरवर असलेली ‘एक्सपायरी डेट’ अर्थात या औषधाच्या मुदतीची तारीख आणि ‘मॅन्युफॅ क्चर डेट’ अर्थात उत्पादनाची तारीख खोडून त्यावर एक छापील चिठ्ठी चिकटविण्यात आलीय. कोरोनाच्या आडून रुग्णांच्या नातेवाईकांना औषध विक्रेत्यांकडून कसे लुटले जाते, याचा हा ढळढळीत पुरावा असल्याचा दावा करून त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. अहमदनगर शहरातल्या आनंदऋषीजी हॉस्पिटल या धर्मादाय दवाखान्यात असलेल्या औषध विक्री करणार्या दुकानात ‘रेमडॅक’ नावाच्या औषध खरेदीसाठी गेलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना हा अनुभव आल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या औषधाची मूळ ‘एक्सपायरी डेट’ आणि ‘मॅन्युफॅ क्चर डेट’ हे सारे संबंधित औषधविक्रेत्याने स्वत:च्या मनाप्रमाणे या औषधाच्या मुदतीची तारीख आणि किमतीची चिठ्ठी चिकटवली असल्याचा ढळढळीत पुरावा असल्याचा दावा करून अहमदनगर महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे आणि मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे हे संबंधित औषध विक्रेत्याविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले असल्याचेही यात स्पष्ट केले गेले आहे.
सर्वच नाही मात्र काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्ण आणि नातेवाईकांची आर्थिक लूट होते, या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची जी लूट सुरु आहे, त्यापासून वाचायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी सतर्कता पाळत औषधाच्या पाकिटावरची ‘एक्सपायरी डेट’ आणि ‘मॅन्युफॅक्चर डेट’ बारकाईने तपासून पाहण्याची गरज आहे तसेच घाईघाईत केलेल्या औषध खरेदीमुळे आर्थिक भुर्दंडसह रुग्णाच्या जीवितालाही धोका होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
सरकारनेच दिली परवानगी
नगरमध्ये व्हायरल झालेल्या त्या व्हीडीओबाबत आनंदऋषीजी हॉस्पिटलने खुलासा केला आहे व सरकारच्या परवानगीनेच कंपनीचा स्टिकर बदलून संपूर्ण महाराष्ट्रात इंजेक्शन पुरवठा होत असल्याचे यात स्पष्ट केले आहे. या खुलाशात हॉस्पिटलने म्हटले आहे की, जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून खरेदी केलेले रेमडेसीवीर इंजेक्शन एक्सपायर झालेले असताना ते रुग्णांना दिले जात आहे, अशा स्वरुपाची तक्रार करणारी व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहे. या क्लिपमुळे रुग्णांचा गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेवून आनंदऋषीजी हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने खुलासा करीत वस्तुस्थिती मांडली आहे. कॅडिला झायडस ही कंपनी जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी असून त्यांच्या इंजेक्शनचा पुरवठा संपूर्ण महाराष्ट्रात होतो. या कंपनीने आपल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचे दर कमी केल्यानंतर सरकारच्या परवानगीनेच नवीन एमआरपीचे स्टिकर लावले तसेच शासनानेच त्यांना एक्स्पायरी डेट 6 महिन्यांऐवजी 12 महिने करण्याची परवानगी दिली. त्यानुसार कंपनीने नवीन एमआरपी व नवीन एक्स्पायरी डेटचे स्टिकर लावलेला माल संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केला. असे नवीन स्टिकर लावलेली इंजेक्शने डिस्ट्रीब्युटर मार्फत आनंदऋषीजी हॉस्पिटलला मिळाली. तीच रूग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे फक्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्येच असे नवे स्टिकर लावलेली इंजेक्शन विक्रीसाठी आहेत, असा कोणताही प्रकार नसून नगर तसेच राज्यातील इतरही हॉस्पिटलमध्ये अशीच इंजेक्शने विक्रीसाठी आहेत. ही सगळी वस्तुस्थिती असताना कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करीत आनंदऋषीजी हॉस्पिटलची बदनामी करण्याच्या हेतूने सदर व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली आहे. हा प्रकार सर्वस्वी निषेधार्ह असून सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करणार्या आनंदऋषीजी हॉस्पिटलला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा खुलासा हॉस्पिटलच्यावतीने विश्वस्त तसेच प्रशासनाने केला आहे. केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियानेच 2 फेब्रुवारी 2021 च्या पत्रानुसार झायडस कॅडिला कंपनीला सदर इंजेक्शनची एक्स्पायरी डेट सहा महिन्यांऐवजी बारा महिने करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कंपनीने सरकारी परवानगीनेच आपल्या इंजेक्शनवर वाढीव एक्स्पायरी डेटचे तसेच कमी केलेल्या एमआरपीचे स्टिकर लावले आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलला या इंजेक्शनचा पुरवठा करणार्या डिस्ट्रीब्युटरनेही सदर इंजेक्शनचे कंपनीकडील खरेदी बिलही हॉस्पिटलला दिले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल सेवाभावी वृत्तीने व सामाजिक बांधिलकी जपून रुग्णसेवेचे कार्य करीत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशात हॉस्पिटलचा उत्त्कृष्ट सेवेसाठी लौकिक आहे. हॉस्पिटलकडून आतापर्यंत कधीही गैरप्रकार झालेले नाहीत व भविष्यातही अशा गोष्टींना कधीही थारा दिला जाणार नाही. त्यामुळे पूर्ण माहिती न घेता असे बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे असून अशा प्रवृत्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी, अशी भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने मांडली आहे.
प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी
सध्याच्या कोरोनाच्या काळात व रोजची वाढती रुग्णसंख्या पाहता प्रत्येकाच्या वैद्यकीय उपचार व सुविधांविषयीच्या भावना जास्तच संवेदनशील झाल्या आहेत. त्यात मागील वर्षी नगरमधील 15 खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारल्याने त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीवर रकमेची रिकव्हरी जिल्हा प्रशासनाने काढली आहे व ती वसुली सध्या सुरू आहे. अशा काळात एखाद्या हॉस्पिटलचे नाव घेऊन तेथे एक्सपायरी डेट खोडून नवीन लेबल लावलेले इंजेक्शन विकले जात असल्याचा व्हिडीओ जर सोशल मिडियातून व्हायरल झाला तर त्याला उत्सुकतेने पाहिले जाते व नगरच्या वैद्यकीय सेवेबद्दल आधीच असलेले संशयास्पद वातावरण अधिक गडद होत आहे. खरे तर त्या इंजेक्शनबद्दल नातेवाईकांना शंका होती, तर त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे त्याबाबत विचारणा करायला हवी होती तसेच मनपाच्या वा सिव्हीलच्या आरोग्य कक्षाकडे लेखी तक्रार करायला हवी होती. पण तसे न करता सोशल मिडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ फिरवला गेला व जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण केले गेले. त्यामुळे आता जर हा व्हीडीओ चुकीचा असेल तसेच संंबंधित इंजेक्शन्सवर लावलेले लेबल कायदेशीर असेल तर आनंदऋषीजी हॉस्पिटलनेच पुढाकार घेऊन हा व्हिडीओ व्हायरल करणारांविरुद्ध तक्रार केली पाहिजे तसेच जिल्हा प्रशासनाने तसेच सिव्हील सर्जन डॉ. सुनील पोखरणा व मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी याबाबत भूमिका मांडली पाहिजे. तसेच नगरच्या खासगी, शासकीय व धर्मादाय वैद्यकीय सेवेबद्दल अविश्वासाचे वातावरण राहू नये म्हणून या प्रकरणातील सत्य तपासून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.
COMMENTS