अहमदनगर/प्रतिनिधी- भाजप व राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळामध्ये नगर शहराची वाट लागली. शहराचे आणि महापालिकेचे नेतृत्व करणारे आमदार हे विकासाच
अहमदनगर/प्रतिनिधी- भाजप व राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळामध्ये नगर शहराची वाट लागली. शहराचे आणि महापालिकेचे नेतृत्व करणारे आमदार हे विकासाचे व्हिजन नसलेले असल्यामुळेच शहराची ही दुरावस्था झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मंगळवारी आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता केला. दरम्यान, शहरातील खड्डे दुरुस्ती होत नसल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने मनपावर आसूड मोर्चा आणून मनपाचे आवार दणाणून सोडले. मनपाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या गेले.
महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. या आघाडीत काँग्रेसही घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मनपावर आसूड मोर्चा जाहीर केल्यानंतरच या मोर्चाविषयी उत्सुकता होती. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस नेहमी विरोधकाची भूमिका बजावेल, असे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी मागेच जाहीर केले होेते. पण मनपात महाविकास आघाडीची सत्ता आली असताना त्यांचा हा विरोधकाचा बाणा कायम असल्याचे मंगळवारी दिसले. यावेळी काळे यांनी मनपा सत्ताधार्यांची नावे न घेता सडकून टीका केली. त्यामुळे शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे.
आसुडाचे आवाज घुमले
शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित नवी कामे तसेच डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मनपावर आसूड मोर्चा नेला. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी पोतराजांसह काळे यांनी आसुडाचे जोरदार आवाज घुमवले. औरंगाबाद रस्त्यावरील टॉप अप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महापालिकेवर आल्यावर आवार आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेले होता. आंदोलकांच्या हातांमध्ये महापालिकेच्या निषेधाचे फलक होते.
मनपा व सत्ताधार्यांवर टीका
यावेळी बोलताना काळे यांनी मनपा प्रशासन व सत्ताधार्यांवर टीका केली. ते म्हणाले की, महापालिकेने गाढ झोपेचे सोंग घेतले आहे. मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जा-ये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का? नागरिकांकडून कर संकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठविली जाते. आता नागरिकांच्या खड्डेमुक्त शहराच्या हक्कासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महापालिकेच्या दारात प्रशासन व सत्ताधार्यांना झोपेतून उठविण्यासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मनपा सत्ताधार्यांची नावे न घेता टीका केली. भाजप, राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळामध्ये नगर शहराची वाट लागली. शहराचे आणि महापालिकेचे नेतृत्व करणारे आमदार हे विकासाचे व्हिजन नसलेले असल्यामुळेच शहराची ही दुरावस्था झाल्याचा आरोप त्यांनी आ. जगतापांचे नाव न घेता केला. नगर शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत, त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प देखील बासनात गुंडाळून पडला आहे. ही सर्व कामे मनपाने तातडीने हाती घेत त्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा, नगरकरांच्या संयमाचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. शहरातील ठराविक ठिकाणीच वारंवार खड्डे पडतात आणि ते खड्डे वारंवार बुजवले जातात. असे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदारांना महापालिका काळ्या यादीत का टाकत नाही ? की संगनमताने महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे, असा सवाल यावेळी काळे यांनी उपस्थित केला. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांची भाषणे झाली. शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी मोर्चाचे सूत्रसंचालन केले. यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. अक्षय कुलट, एससी विभागाचे नाथा अल्हाट, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, सचिव प्रशांत वाघ, सागरदादा काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शारदा वाघमारे, नलिनी गायकवाड, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, लखन छजलानी, रावसाहेब काळे, दीपक चांदणे, साईनाथ बोराटे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, आसाराम पालवे, राहुल गांधी विचार मंचचे सागर ईरमल, सचिव अॅड. सुरेश सोरटे, सहसचिव शंकर आव्हाड, सिद्धार्थ झेंडे, अविनाश धनगर, राणी पंडित, शबाना बागवान, रिजवाना शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.
आयुक्तांचा निषेध
मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी बाहेर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. काँग्रेसने केलेल्या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र, आयुक्त शंकर गोरे हे आंदोलकांचे निवेदन घेण्यासाठी स्वतः बाहेर न आल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा निषेध केला.
पोलिसांची तक्रार करणार
बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक सोळंके यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना विनाकारण काँग्रेस पदाधिकार्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसी सभ्यतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी पदाधिकार्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी केला व याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS