अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री व मेडिकलसह किराणा व भाजीपाला व पशुखाद्य विक्रीला मुभा देणारा निर्णय महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी अवघ्या दोन दिवसात मागे घेतला आहे. त्यामुळे शनिवारी (15 मे) व
अहमदनगर/प्रतिनिधी- अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री व मेडिकलसह किराणा व भाजीपाला व पशुखाद्य विक्रीला मुभा देणारा निर्णय महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी अवघ्या दोन दिवसात मागे घेतला आहे. त्यामुळे शनिवारी (15 मे) व रविवारी (16 मे) सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडलेली किराणा दुकाने व रस्त्यांवर झालेली भाजी विक्री तसेच मांस विक्री आता सोमवारपासून (17 मे) पुन्हा बंद झाली आहे. या दोन दिवसात बाजारात झालेल्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीचा धोका असल्याचा दावा पोलिसांनी केल्याने आयुक्त गोरे यांनी पुन्हा दूधविक्री, पशुखाद्य व बी-बियाणे आणि खते विक्री तसेच मेडिकल वगळता अन्य सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दूध विक्री व मेडिकल दुकाने वगळता अन्य आस्थापना बंद करण्याचे सुचवले होते. त्यानुसार आयुक्त गोरे यांनी पहिल्या टप्प्यात 2 ते 10 व नंतर दुसर्या टप्प्यात 11 ते 14 या कालावधीत फक्त दूध विक्री व मेडिकल दुकानांना परवानगी दिली होती. त्यामुळे या काळात किराणा दुकाने, भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य विक्री, मांस विक्री बंद राहिली. नागरिकांचे त्यामुळे हाल झाले. शिवाय महापालिकेने नागरिकांना किराणा व भाजीपाला घरपोहोच मिळण्यासाठीही काही सुविधा केली नव्हती. त्यामुळे गरजवंत नागरिकांना चोरीछुपे किराणा व भाजीपाला घ्यावा लागला व तोही वाढीव भावाने मिळत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसला. या पार्श्वभूमीवर 14 मे रोजी आयुक्त गोरे यांनी निर्बंध शिथील केले व सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा दुकाने, भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य दुकाने व मांस विक्रीला मुभा दिल्याने शनिवारी (15 मे) व रविवारी (16 मे) नागरिकांसह व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला. पण आता पुन्हा पहिल्यासारखे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अर्थात यातून पशुखाद्य विक्री व खते तसेच बी-बियाणे विक्रीला सकाळी चार तासांसाठी परवानगी दिली गेली आहे.
पोलिसांनी घेतला होता आक्षेप
कृषी निविष्ठा केंद्रांवर खरेदीसाठी शेतकर्यांंची गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने शेतीशी निगडीत असलेले शहर हद्दीतील कृषी सेवा केंद्र चालू ठेवण्याबाबत व त्यांच्याशी निगडीत उत्पादन व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची विनंती केल्याने 15 मे सकाळी 7 वाजेपासून ते 24 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंतच्या काळासाठी निर्बंधामध्ये अंशतः बदल करुन वेळेचे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आक्षेप घेतल्याने तसेच आयुक्त गोरे यांना पत्र देऊन कृषीविषयक दुकाने (विक्री दुकाने), माल वाहतूक, भाजीपाला वाहतुकीबाबत नवीन दिलेल्या सवलतीमुळे या आस्थापनांवर गर्दी होऊन कोविड-19चे संक्रमण वाढेल व त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा दावा करून सवलतीचे आदेश रद्द करण्याचे सुचवल्याने आयुक्त गोरे यांनी दिलेली सवलत काहीअंशी रद्द करून पुन्हा नव्याने निर्बंध जारी केले आहेत.
नगरकरही जबाबदार ठरले
आयुक्त गोरे यांनी वेळेचे बंधन घालून किराणा, भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य विक्री व मांस विक्रीला परवानगी दिल्यावर नगरकरांनीही जबाबदारीने न वागता बाजारात गर्दी केल्याने पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ मनपावर आली. 15 व 16 रोजी शहरामध्ये भाजीपाला, किराणा व अत्यावश्यक वस्तु खरेदी-विक्री करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू-19चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सवलतीचा आदेश रद्द करण्यात येत असून, हे आदेश आता 16 मे पासून 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत जारी असणार आहेत.
या आस्थापनांना सवलत
-वैद्यकीय सेवा व औषध दुकाने सुरू राहतील.
-अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
-घरपोहोच गॅस वितरण सेवा सुरु राहील.
-सर्व बँका सुरू राहतील.
-दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी 7 ते 11 सुरू राहील.
-पशुखाद्य विक्री सकाळी 7 ते 11 सुरू राहील.
-बी-बियाणे, खते व कीटकनाशक दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहतील.
या आस्थापनांना बंदी
-किराणा दुकाने व तदनुषंगिक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.
-भाजीपाला व फळे बाजारमालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.
-सर्व खासगी आस्थापना पूर्णत: बंद राहतील.
– अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहील.
-शेतीशी निगडीत मशिनरी, पंप इत्यादी दुकाने बंद राहतील.
– या आदेशांचे उल्लघंन केल्यास दंडनीय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.
—
COMMENTS