राहाता : तालुक्यातील साकुरी येथे पतसंस्थेच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सं

राहाता : तालुक्यातील साकुरी येथे पतसंस्थेच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित वसुली कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गायकवाड असे मृत युवकाचे नाव आहे. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास एका पतसंस्थेचे वसुली कर्मचारी गायकवाड यांच्या घरी आले. त्या वेळी योगेश घरी नसून त्यांची आई घरात होती. कर्जाची थकबाकी भरली नसल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी घर जप्त करून बाहेर काढू, अशी धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
यानंतर योगेश यांच्या आईने त्यांना फोन केला असता वसुली कर्मचाऱ्यांनी मोबाईल घेऊन योगेश यांच्याशी थेट बोलत पैसे तातडीने भरण्याचा दबाव टाकल्याचे सांगितले जाते. योगेश यांनी थोडी मुदत देण्याची विनंती केली होती; मात्र ती मान्य करण्यात आली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.
दुपारी सुमारे तीनच्या सुमारास खोलीत जाऊन पाहिले असता त्यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शिर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृताचे भाऊ निलेश गायकवाड यांनी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी व राहाता पोलिस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित वसुली अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS