Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडकनाथ कोंबडी फसवणुकीच्या नैराशेतून युवकाची आत्महत्या

इस्लामपूर / प्रतिनिधी : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत अ‍ॅग्रो कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळावेत. यासाठी महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या अधिकार्‍या

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 
आगटीतल्या हुरड्याची अन हावळ्याची चव काही न्यारीच : फास्टफूडमध्ये अडकलेली पिढी यापासून दूरच
विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड ; मंत्रिमंडळ निर्णय

इस्लामपूर / प्रतिनिधी : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात महारयत अ‍ॅग्रो कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळावेत. यासाठी महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या अधिकार्‍यांच्या दारात हेलपाटे मारूनही पैसे परत मिळत नाहीत. कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या नैराशेतून विषारी औषध प्राशन करून कोंगनोळी येथील विकास शिवाजी पवार (वय 36) या तरुण शेतकर्‍याने शुक्रवार, दि. 24 रोजी आत्महत्या करून जीवन संपवले. या आत्महत्येमुळे शेतकर्‍याची पत्नी, दोन मुले व एक मुलगी असे शेतकर्‍याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
बळी गेलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक कॉ. दिग्विजय पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी सांत्वन केले. महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र कर्नाटकसह इतर काही राज्यात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकरी, बेरोजगार तरुणांना ओढून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे संचालक सुधीर मोहिते व संदीप मोहिते यांनी कडकनाथ कोंबडी व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकरी जाळ्यात ओढले. कर्जे काढून शेतकर्‍यांनी व्यवसायात भांडवल गुंतवले. मोहिते बंधूनी कडकनाथ कोंबडी पालन करणार्‍या शेतकर्‍यांना रस्त्यावर आणले.
कडकनाथ प्रकरणी आ. सदाभाऊ खोत हे सामील असून सत्ताधारी राज्यकर्ते व प्रशासन कोट्यवधी रुपयांचा घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घालत असल्याचा घणाघाती आरोप कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक कॉ. दिग्विजय पाटील यांनी केला.
कर्जबाजारी झालेले शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. याला महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे संचालक सुधीर मोहिते, संदीप मोहिते व या घोटाळ्यांशी संबंधित असणारे आ. सदाभाऊ खोत त्याचबरोबर या घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घालणार्‍या सत्ताधार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉ. दिग्विजय पाटील यांनी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौर्‍यात त्यांच्या गाडीपुढे कडकनाथ कोंबड्या टाकून या घोटाळ्याची तीव्रता तत्कालीन सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस यांचे मंत्रिमंडळात मंत्री असणार्‍या आ. सदाभाऊ खोत व त्यांचे निकटवर्तीय महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे संचालकांना पाठीशी घालण्याचे काम फडणवीस सरकारने केले. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी दुर्लक्षित केली. पोलीस प्रशासनानेही संत गतीने कारवाई केली. आजही पै-पै करून जमवलेल्या पैशांची लूट झाल्याने फसवणूक झालेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे दुर्दैवी असून आताचे सत्ताधारीही शेतकर्‍यांची फसवणूक मनावर घेत नाहीत. उलट घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घालत आहेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, शशिकांत पवार, राजू पोतदार व इतर उपस्थित होते.

COMMENTS