अहमदनगर/प्रतिनिधी ः संतश्रेष्ठ जगदगुरू संत तुकाराम महाराज व साईबाबांबद्दल बेताल वक्तव्य करणार्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचा नगर शहरात
अहमदनगर/प्रतिनिधी ः संतश्रेष्ठ जगदगुरू संत तुकाराम महाराज व साईबाबांबद्दल बेताल वक्तव्य करणार्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचा नगर शहरात दरबार लावल्यास काँग्रेस उधळून लावेल, असा इशारा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. दरम्यान, शहरातील लोकप्रतिनिधी या भोंदू बाबाला शहरामध्ये दरबार लावण्यासाठी आणण्याच्या प्रयत्नात असून नुकत्याच मुंबईत झालेल्या त्याच्या दरबाराच्या वेळी त्यांचे प्रतिनिधी त्याला निमंत्रण द्यायला गेले होते, असा आरोप काळे यांनी केला व याअनुषंगाने, आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गुणे शास्त्री आयुर्वेद चौकाचे नाव बदलून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चौक असे नाव द्यावे, अशी मागणी महापालिकेकडे केली जाणार आहे व या नावाला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करताना, जे विरोध करतील व अंगावर येतील, त्यांना काँग्रेस शिंगावर घेण्याचे काम करेल, असा इशाराही काळेंनी दिला आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल आधी अपशब्द वापरणार्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीने आता साईबाबांबद्दल देखील बेताल वक्तव्य केले असून, अहमदनगर शहर काँग्रेसने त्याचा निषेध केला आहे व हिंदू धर्मीयांसह अन्य धर्मीयांच्या भावना दुःखविणार्या या भोंदू बाबाला नगरमध्ये आणल्यास काँग्रेस त्यांचा दरबार उधळून लावेल, असा इशारा देणारे पत्र काळे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना पाठवले आहे. संत तुकाराम महाराज हिंदू धर्मीय होते व साईबाबांना सर्व धर्मीयांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. जगात श्रेष्ठ मानल्या जाणार्या महनीय संतांच्या अवमानाची सुपारी त्या भोंदू बाबाने घेतली आहे. यामुळे संत परंपरेचा अवमान होत आहे. पण, या महाशयांचा दरबार नगरमध्ये लावण्यासाठी एक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. पण, शहरात काँग्रेस कार्यकर्ते त्यांचा दरबार उधळून लावतील. तसेच, कोणी त्यांना नगर शहरात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या दरबारास पोलिसांनी परवानगी देऊ नये व त्यांना शहरामध्ये येण्यास बंदी घालावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
COMMENTS