Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

काँगे्रसने नुकतीच आपली 39 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. खरंतर देशात 2014 पासून भाजपची सत्ता आल्यापासून काँगे्रस गलितगात्र झालेली होती.

शाश्‍वत विकासाच्या दिशेने
काँगे्रसला गळती !
नितीशकुमार संधीसाधू राजकारणी

काँगे्रसने नुकतीच आपली 39 सदस्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. खरंतर देशात 2014 पासून भाजपची सत्ता आल्यापासून काँगे्रस गलितगात्र झालेली होती. कारण पक्षासमोर कार्यकर्त्यांना देण्यासाठी कोणताही कार्यक्रम नव्हता, पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे काँगे्रसचे जहाज सातत्याने भरकटतांना दिसून येत होते. मात्र राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढून पक्षाला एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने पक्षाला अध्यक्ष मिळाल्यामुळे पक्ष आपल्या जुन्या वाटेवर परततांना दिसून येत आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाला जनाधार मिळवण्यासाठी पद्धतशीर आणि नियोजनबद्धरित्या प्रयत्न करावे लागतात. अन्यथा पक्षाला गळती लागते. मात्र आजमितीस विचार केल्यास काँगेसने पक्षाला सातत्याने नव-नवे कार्यक्रम दिले तर पक्षाला जुने दिवस येण्यासाठी वेळ लागणार आहे. खरंतर 1984 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसला कधीही स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. आघाडी करून काँग्रेसने 1991 आणि 2004 मध्ये सत्ता मिळाली. 15 वर्षांत काँग्रेसकडे सत्ता होती; परंतु या काळात पक्षाने नव-नवीन ध्येय धोरण राबविण्यावर कधीही भर दिला नाही. जग डिजिटल युगाकडे जात असतांना, प्रचार-प्रसार मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून घरा-घरामध्ये पोहचत असतांना, काँगे्रस मात्र यापासून बराचसा अलिप्त राहिला, परिणामी त्याचे परिणाम काँगे्रसला भोगावे लागले. मात्र आता काँगे्रस सर्वसमावेशक धोरण स्वीकारत पक्षातील सर्वच नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. त्यामुळेच सचिन पायलट यांना देखील कार्यकारिणीवर घेवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पक्षांतर्गत गटबाजी नवी नाही. सत्तेच्या काळात या गटबाजीचे प्रदर्शन फार होत नाही. सत्ता त्यावर उतारा असतो आणि गटबाजी थांबविता येते; परंतु सत्ता नसली, की पक्षश्रेष्ठींचा दराराही कमी होतो. त्यांच्याविरोधातील बंडाला धार येते. काँग्रेसमध्ये सध्या त्याचा अनुभव येत असतो. नेत्यांना संघटनेत आणि सत्तेत कितीही वाटा दिला, तरी त्यांचे  समधान होत नसते. त्यामुळे विकलांग नेतृत्वाविरोधात बंडाची भाषा त्यांच्या तोंडून येते. राजस्थानमध्ये पक्षश्रेष्ठी सध्या तोच अनुभव घेतांना दिसून येत आहे. मात्र यात समन्वय साधून दोन्ही नेते पक्षाला हवे आहेत, हे पटवून देण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींची आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकानंतर काँगे्रस पक्ष पूर्ण बॅकफुटवर गेला असून, काँगे्रसला ऊर्जितावस्था देण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांना कोणताही कार्यक्रम दिला नाही. त्यामुळे काँगे्रस पक्षात आलेली मरगळ सातत्याने वाढत गेली. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देण्याची पक्ष नेतृत्वाची गरज असते. मात्र काँगे्रसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष नसल्यामुळे ही पोकळी कार्यकर्त्यांना प्रकर्षांने जाणवत होती. त्यानंतर काँगे्रसने दोन कार्यक्रम आखले, त्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा थोडया-फार प्रमाणात उत्साह निर्माण होतांना दिसून येत आहे. प्रथम म्हणजे काँगे्रसने सुरु केलेली भारत जोडो यात्रा. या यात्रेमुळे काँगे्रसपासून दुरावलेला कार्यकर्ता पुन्हा पक्षांशी जोडला जात आहे. शिवाय राहुल गांधी स्वतः या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत, लोकांशी संवाद साधत आहे, माध्यमांना मुलाखती देत आहेत, त्यामुळे पक्षाला नवचेतना मिळतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे काँगे्रसला नवा अध्यक्ष मिळाला. मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील असून, काँगे्रसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड पक्षासाठी ऊर्जा देतांना दिसून येत आहे. त्यानंतर पक्षाला पुन्हा एकदा जम्बो कार्यकारिणी मिळाल्यामुळे पक्ष पुन्हा एकदा उभारी घेईल, यात शंका नाही. मात्र त्यासाठी काँगे्रसने पुन्हा एकदा नव-नवीन कार्यक्रम देण्याची गरज आहे. आगामी लोकसभेसाठी केवळ 1 वर्षांचा अवधी असतांना पक्षाने पुन्हा एकदा देश पिंजून काढण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रेसारखा नवा कार्यक्रम पक्षाला दिला तर, पक्ष पुन्हा एकदा जोमाने उभारी घेईल आणि त्याचा पक्षाला निवडणुकीत फायदाच होईल, यात शंका नाही.

COMMENTS