Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवठेमहांकाळची पुनरावृत्ती इस्लामपूरात होणार का?

रोहित पाटील प्रतीक पाटील युवा नेते प्रतिक पाटील यांच्याकडे पालिका निवडणूकीची धुराइस्लामपूर / प्रतिनिधी : कवठेमहाकाळ नगरपंचायतीमध्ये स्व. आर. आर

अनामत रक्कम न भरलेल्या 51 ठेकेदारांना सांगली मनपा सीईओंची नोटीस
मेढा नगरपंचायतीसमोर बाधितांसह रहिवाशी शेतकर्‍यांचे सोमवारी आंदोलन
फलटण नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमण; स्थानिक नागरिकांचा उपोषणाचा इशारा

युवा नेते प्रतिक पाटील यांच्याकडे पालिका निवडणूकीची धुरा
इस्लामपूर / प्रतिनिधी : कवठेमहाकाळ नगरपंचायतीमध्ये स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आणली. कवठेमंकाळची पुनरावृत्ती इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव व महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील हे करून दाखवणार का? याची चर्चा शहरात सुरू आहे.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे. गत इस्लामपूर पालिका निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले. गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी व विकास आघाडीने पालिका सभेत आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय दुसरे काही केले नाही. इस्लामपूर शहराच्या विकासाचा अजेंडा बाजूला सारत एकमेकांना कमी लेखण्यासाठी राजकिय कुरघोड्या करण्यात पाच वर्षे पूर्ण झाली.
इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खमके नेतृत्व नाही. त्यामुळे पालिकेची धुरा मंत्री जयंत पाटील यांनी राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्याकडे दिली आहे. काही महिन्यांवर आलेल्या पालिका निवडणूकीत प्रतिक पाटील यांना नगराध्यक्ष निशिकांत पाटील व भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल महाडीक यांचे आव्हान असणार आहे. पालिकेतील विकास आघाडीपुढे प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्याकडे पालिकेचे एकमुखी नेतृत्व होते. त्यांनी पालिकेवर तीस वर्षे सत्ता गाजवलेली होती. परंतू त्यांच्या निधनानंतर इस्लामपूर पालिकेत त्यांच्यासारखे एकमुखी असे खमके नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाला मिळाले नाही. अंतर्गत बंडाळी, कुरघोड्या, राजकीय हेवेदावे यामुळे सर्वसमावेशक असे नेतृत्व उदयाला आले नाही. याचा फायदा बरेच वेळा राष्ट्रवादी विरोधकांना झाला आहे.
गत पालिका निवडणूकीत उमेदवारीवरून नाराज झालेल्यांनी राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यामुळे निशिकांत पाटील यांनी तीस वर्षाची सत्ता उलथवून टाकत पालिकेवर विकास आघाडीचा झेंडा फडकवला. पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वकीयांची मनधरणी करणे, पक्षीय पातळीवर म्हणजे कमळ, धनुष्य बाण, हात चिन्हावर निवडणूक लढवणे आदी बाबी विकास आघाडीसाठी अडचणीच्या आहेत.
स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यावर कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीची जबाबदारी होती. रोहित पाटील यांना स्वकीयांसह विरोधी गटातील नेत्यांचा विरोध होताना दिसत होता. पालकमंत्री जयंत पाटील यांची एकही सभा कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीत झाली नाही. रोहित पाटील यांनी एकला चलो चा नारा घेत जनसामान्यांच्या पंगतीला बसत त्यांच्या मनात आपला विचार रुजवण्यात ते यशस्वी झाले. या उलट प्रतिक पाटील यांना इस्लामपूर पालिका निवडणुकीचा अनुभव नवीन असणार आहे. त्यांना इस्लामपूरच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ पुरत नाही की वेळ मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे. मंत्री जयंत पाटील यांच्यासारखे प्रतीक पाटील यांच्या शहरातील दौर्‍यात मोजकेच म्हणजे तेच ते चेहरे असतात. यामुळे त्याच चेहर्‍यांना घेऊन शहरातील राजकारण करा असा सूर शहरातील नेते, नागरिक, युवा वर्गातून निघत आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी विरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, वंचित आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. ऐन थंडीत पालिका निवडणूकीचे वारे झोंबू लागले आहे. तरी प्रतीक पाटील हे इस्लामपूर पालिका निवडणुकीत कवठेमहांकाळची पुनरावृत्ती करणार का? हा येणार काळच सांगेल.

COMMENTS