परीक्षा घोटाळामागे राजकीय वरदहस्त कुणाचा ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

परीक्षा घोटाळामागे राजकीय वरदहस्त कुणाचा ?

राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर आलेला कोरोना यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सरळ सेवा भरती झालेल्या नव्हत्या. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या परी

सर्वसामान्यांचा विसर
विकासाचा विरोधाभास
आता पोलिस दलातही कंत्राटी भरती  

राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर आलेला कोरोना यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सरळ सेवा भरती झालेल्या नव्हत्या. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या परीक्षा होऊ घातल्या होत्या. मात्र या परीक्षातून मोठा घोटाळा करत, या परीक्षेचे सुत्रधार मोठी माया जमवत असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र या घोटाळयामुळे विद्यार्थी मानसिकदृष्टया खचलेले दिसून येतात. वशिला आणि पैसा असल्याशिवाय नोकरी लागत नाही, हा अनेक वर्षांचा असलेला गैरसमज या घोटाळयामुळे खरा ठरतांना दिसून येत आहे. नियोजनबद्धरित्या हा घोटाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या घोटाळयाची व्याप्ती मोठी असून, 2016 आणि 2017 पासून घेण्यात आलेल्या परीक्षेतून अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची वर्णी लावली असल्याची धक्कादायक माहिती समोर येतांना दिसून येत आहे.
वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षांपासून नोकर्‍या नाही, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आणि वेळेवर निकाल न लागल्यामुळे स्वप्नील लोणकर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर दुसरीकडे ज्या परीक्षा होत होत्या, त्यामध्ये वशीलेबाजी होत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही सोयी-सुविधा नसतांना केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणण्याचा चंग बांधून असतात, अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा एक प्रकार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्‍विनकुमार यांना अटक करण्यात आली आहे. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जीए टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यातील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता पुणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. त्यावेळी परीक्षा नियंत्रक डेरे होते. तर, परीक्षेचे कंत्राट जीए टेक्नॉलॉजीकडे होते. या परीक्षेतही घोटाळ्याचा पॅटर्न सारखा असल्याचे समोर आले. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी टीईटीचे प्रमाणपत्र सादर करत नोकर्‍या मिळवल्या, त्यांच्या नोकर्‍यांवर देखील गंंडातर येण्याची शक्यता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या घोटाळयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे, यातील कोणत्या राजकीय नेत्याच्या पाठिंब्यावर हे सुरू होते, याचा तपास करणे गरजेचे आहे. शिवाय सुपेकडे जे पैसे सापडले आहेत, ते पैसे त्याचेच आहे की, कुण्या राजकीय मंत्र्यांचे पैसे त्याने लपवून ठेवले होते. शिवाय पोलिस येण्याची चाहूल लागल्यामुळे त्याने हे पैसे आपल्या आप्त स्वकीयांकडे दिले होते, याचा तपास होणे गरजेचे आहे. विधीमंडळांच्या अधिवेशनात देखील प्रामुख्याने परीक्षा घोटाळा मोठया प्रमाणात चर्चिला गेला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर परीक्षा घोटाळातील रेटकार्डच विधीमंडळात सादर केले. फडणवीस म्हणाले, आरोग्य, म्हाडा, टीईटी अशा सगळ्याच परीक्षांमध्ये गडबडी झाल्या. एकेका पदासाठी 20 लाखांची बोली लागली होती. एकट्या अमरावतीत 200 जणांनी पैसे दिले. दलाल रेटकार्ड घेऊनच फिरत होते. असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या घोटाळयाची व्याप्ती मोठी असून, राजकीय वरदहस्ताशिवाय परीक्षा घोटाळा होणे शक्य नाही. त्यामुळे आपला वाटा घेऊन शांत बसलेला हा राजकीय बडा मासा कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

COMMENTS