Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घंटागाडीचे 6 कोटींचे टेंडर कुणाला?

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलन करण्यासाठी सातारा नगरपालिकेमार्फत खासगी ठेकेदार नेमण्यात आला होता. या ठेकेदाराचा कार्यका

सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलन करण्यासाठी सातारा नगरपालिकेमार्फत खासगी ठेकेदार नेमण्यात आला होता. या ठेकेदाराचा कार्यकाल संपला असल्याने ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. याबाबतची अंतिम कार्यवाही लवकरच सातारा पालिकेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे. कचरा संकलन करण्यासाठी सहा कोटींचे टेंडर कुणाला मिळणार, याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा शहर आणि परिसरातील कचरा संकलनाचे काम पालिकेने ‘भाग्यदीप’ या संस्थेस दिले होते. काम दिल्यानंतर ठेकेदाराकडे पालिकेच्या 40 घंटागाड्या सोपविल्या होत्या. घंटागाड्यांच्या मदतीने शहरातील विविध भागातील कचरा संकलन करून सोनगाव कचरा डेपोत प्रक्रियेसाठी पोचविण्याची जबाबदारी ठेकेदारावर टाकण्यात आली होती. ठेक्याची मुदत संपल्यानंतर पालिकेने फेर निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. दर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती फाईल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पालिका प्रशासनाने सादर केली. या फाईलला मंजुरी दिल्यानंतर पालिकेने त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली.
त्यानुसार जाहीर झालेल्या निविदा प्रक्रियेवरील अंतिम कार्यवाही उद्या सातारा पालिकेत होणार आहे. सुमारे 6 कोटी रुपयांचे टेंडर कोणत्या कंपनीस मिळणार? याकडे पालिका प्रशासनासह सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेने स्वत:च्या 40 घंटागाड्या सध्या कार्यरत असणार्‍या ठेकेदारास वापरासाठी दिल्या होत्या. या घंटागाड्या पुन्हा एकदा पालिका ताब्यात घेणार आहे. त्यापूर्वी या घंटागाड्यांची तांत्रिक तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशही पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारास दिले आहेत.
स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी 4 कोटी
कचरा संकलनासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचे टेंडर पालिकेने जाहीर केले होते. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता व इतर कामांसाठीचे 4 कोटींची टेंडर काढण्याची प्रक्रिया पालिकास्तरावर पार पाडण्यात येणार आहे. या टेंडरदरम्यानही ठेकेदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS