Homeताज्या बातम्यासंपादकीय

जनतेचा कौल कुणाला मिळणार  ?

लोकशाहीचा उत्सव संपुष्टात आला असून, निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. मात्र त्यापूर्वी मतदानोत्तर कलचाचण्यांचा निष्कर्ष समोर आला आहे.

बेजबाबदारपणाचे बळी !
नीती आयोग आणि संघर्ष
मान्सूनचे शुभवर्तमान

लोकशाहीचा उत्सव संपुष्टात आला असून, निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. मात्र त्यापूर्वी मतदानोत्तर कलचाचण्यांचा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र हा निष्कर्ष काँगे्रसने अमान्य करत सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष असल्यामुळे कल आपल्याच बाजूने लागेल असा विश्‍वास विरोधकांनी दर्शवला आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सत्ता आपल्याच मिळणार असा दावा करत असले तरी, त्याचा फैसला म्हणजे उद्या मंगळवारी होणार आहे. काँगे्रसने इंडिया आघाडीच्या 275 जागा येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह सर्वच नेत्यांनी इंडिया आघाडी सत्तेत येईल असा दावा केला आहे. मात्र इंडिया आघाडीने जरी 200 पर्यंत मजल मारली तरी, इंडिया आघाडी सत्तेत येवू शकत नाही. यासोबतच भाजपच्या जागा कमी होतील असा अंदाज होता, मात्र महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत भाजपला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरा निकाल उद्या जाहीर होणार आहे, यात कोणतीही शंका नाही. त्यात जनतेचा कौल कुणाला मिळणार याचा फैसला होणार आहे.

या निकालाकडे केवळ देशाच्या नव्हे तर जगभराच्या नजरा लागलेल्या असतील, यात नवल नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यादांच काँगे्रस व्यतिरिक्त एका पक्षाला संपूर्ण आणि एकहाती बहुमत 2014 मध्ये मिळाले. केवळ असे बहुमत एकदाच नव्हे तर 2019 मध्ये देखील मिळवले. त्यानंतर आता तिसर्‍यांदा पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल का, असा सवाल उपस्थित होत असतांना, कलचाचण्यांनी तर थेट एनडीएला 350 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र या एक्झिट पोलचे अंदाज अनेकवेळेस फोल ठरल्याचे दिसून येतात. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, कलचाचण्यांचा केवळ अंदाज असतो. त्यामागचे गणित बघितले तर, एका मतदारसंघासाठी साधारणतः 12-15 लाख मतदार असतात. त्यापैकी केवळ हजार-बाराशे लोकांचे मत जाणून घेतल्यानंतर हा सर्वे तयार केला जातो. त्यामुळे 12-15 लाख मतदारांपैकी केवळ 0.1 किंवा 0.2 टक्के मतांच्या जोरांवर हा दावा केला जातो. त्यातून या चाचण्यांचे अंदाज जाहीर केले जातात. त्यातील बहुतांश निकाल योग्य येतात, मात्र अनेकवेळेस हा दावा फसतो. शिवाय 2014 आणि 2019 च्या लढती बघितल्यास त्या एकतर्फी असल्याचे दिसून येत होत्या. याउलट काँगे्रसने 2024 मध्ये निवडणूक प्रचारात जीव ओतला होता. शिवाय जनतेतून नाराजी होती, त्यामुळे यंदा तुल्यबळ लढती झाल्याचे दिसून येत आहे.  सत्तेचा मार्ग हा जनतेतून जातो. त्यामुळे जनतेशी नाळ कुणाची जोडलेली आहे, याचा फैसला अवघ्या काही तासांमध्येच होणार आहे. मणिपूर घटनेनंतर ईशान्येकडील राज्यांत भाजपविरोधी रोष असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अरूणाचलमध्ये भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे, हे विशेष. एकूण 60 जागांपैकी भाजपने 10 जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यातच मतमोजणीत भाजपने 60 पैकी 46 जागा जिंकत आपला गड कायम राखला आहे. त्यामुळे भाजपचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत आहे. शिवाय कलचाचण्यांमध्ये दक्षिणेकडील राज्यात भाजप चांगल्या जागा मिळवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंध्रप्रदेश आणि कर्नाटक आणि तामिळनाडू या तीनही राज्यात भाजप चांगल्या जागा मिळवील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तर तेलंगणामध्ये भाजप आणि काँगे्रस फिफ्टी-फिफ्टी जागा मिळवतील असा अंदाज आहे. मात्र भाजप जर दक्षिणेकडील राज्यात पाय पसरत असेल विशेष म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणात काँगे्रसची सत्ता असतांना देखील या राज्यांत काँगे्रसला पुरेशा जागा मिळणार नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे काँगे्रससाठी ही धोक्याची घंटा आहे.

COMMENTS