Homeताज्या बातम्यासंपादकीय

दिल्ली विधानसभेचे मैदान कोण मारणार ?

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाइी आज बुधवारी मतदान होत आहे, त्याचा निकाल 8 फेबु्रवारी रोजी लागणार आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आण

कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
उद्धव ठाकरे कुठे चुकले ?
हलगर्जीपणा नको…

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाइी आज बुधवारी मतदान होत आहे, त्याचा निकाल 8 फेबु्रवारी रोजी लागणार आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि आप या दोन्ही पक्षात चुरशीचा सामना दिसून येत आहे. एकीकडे भाजपने आपच्या भ्रष्टाचारावर प्रहार केला तर, दुसरीकडे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल देखील त्वेषाने लढतांना दिसून आले. यात प्रामुख्याने म्हणजे इंडिया आघाडीतील नेते आपचा मोठ्या दिमाखात प्रचार करून दिल्लीतील वातावरण ढवळून टाकतील अशी अपेक्षा होती, मात्र आपला केवळ पाठिंबा देण्यापुरतेच काम इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केले. या निवडणूकीत काँगे्रस देखील लढत देत असली तरी, काँगे्रस कुणाची मते खाणार यावर समोरच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला सर्वप्रथम जे यश मिळाले ते म्हणजे मुख्यमंत्री सन्मान योजना. या योजनेनुसार महिलांना एक हजार रूपये देण्याची सुरूवात केजरीवाल यांनी अनेक वर्षांपूर्वी केली होती. म्हणजेच आत्ताची जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ती मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यात राबवण्यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीत राबवली होती, त्याशिवाय 200 युनिटपर्यंत वीज मोफत, शालेय शिक्षणांचा दर्जा चांगला सांभाळल्यामुळे आपला यश मिळत गेले. मात्र त्यानंतर भाजपने या योजनांचा गांभीर्याने विचार करून सर्वप्रथम हातातून सत्ता जाणार असा अंदाज असतांना मध्यप्रदेशात भाजपने सत्ता मिळवली ती केवळ या योजनेमुळेच. तोच कित्ता हरियाणात आणि महाराष्ट्रात तर भरघोस मतदान महायुतीला मिळाले, त्यामुळे या योजना गेमचेंजर ठरल्या. तोच कित्ता भाजपने दिल्लीत देखील गिरवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आश्‍वासनांची खैरात आपसह भाजपने देखील केल्या आहेत. त्यामुळे यंदा दिल्लीचे मैदान कोण मारणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. किंबहूना स्वच्छ आणि पारदर्शक कारभार देवू म्हणणार्‍या आपच्या नेत्यांना जेलवारी करावी लागली, यात दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील सुटले नाहीत. त्यामुळे केजरीवाल, मनीष सिसोदिया या नेत्यांना अनेक दिवस तुरूंगात काढावे लागले. कथित मद्य धोरण घोटाळ्यात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले, त्यामुळे प्रथमच आपच्या पारदर्शक कारभारला तडा गेला. भाजपने आपला चांगलेच घेरले. या संपूर्ण निवडणुकीत काँगे्रसचा कुठेच बोलबाला राहिलेला दिसून आला नाही. त्यामुळे प्रामुख्याने ही लढत आप आणि भाजप या दोघांमध्येच होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपने आप शीशमहल बनवल्याचा निशाणा साधला तर, दुसरीकडे केजरीवाल यांनी यमुनेत विषाचा मुद्दा पुढे केला. याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस देखील पाठवली आहे. त्यामुळे दिल्ली निवडणूक अनेक कारणांनी गाजतांना दिसून येत आहे. दिल्लीत मतदानासाठी 13 हजार 766 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 83.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1267 तृतीयपंथी मतदार आहेत. 733 मतदान केंद्रे दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेअंतर्गत, 7553 पात्र मतदारांपैकी 6980 लोकांनी आधीच मतदान केले आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत निमलष्करी दलाच्या 220 कंपन्या तैनात केल्या आहेत. 19 हजार होमगार्ड आणि 35 हजार 626 दिल्ली पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत चोख बंदोबस्त असून, यावेळेस मतदार नेमका कुणाला कौल देतात, ते अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे, मात्र या निवडणुकीमुळे आपचे पुढील भवितव्य ठरणार आहे. कारण आपने आपले पाय दिल्लीतूनच इतर राज्यात पसरवले होते, त्यामुळे दिल्ली ताब्यात राहणे आपसाठी महत्वाचे आहे, अन्यथा आपला घरघर लागली हेच स्पष्ट होईल, कारण आपने दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवली आहे, आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे, त्यामुळे ही निवडणूक आपसाठी विशेष महत्वाची ठरणार आहे, त्यावर केजरीवाल यांचे पुढील भवितव्य ठरणार आहे.

COMMENTS