आम्ही मूकनायकाचे वारसदार

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आम्ही मूकनायकाचे वारसदार

३१ जानेवारी २०२२ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक पाक्षिकाला १०२ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या

अन्नदात्याला चिरडण्याचा प्रयत्न
लोकानुनयाचा उदय
जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण

३१ जानेवारी २०२२ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक पाक्षिकाला १०२ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून ओळखली जाते. असे असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. धर्मशास्त्राचे चिकित्सक, अर्थतज्ञ् , कामगार नेते, दीनदुबळ्याचे कैवारी,  द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते असे आपल्या लक्षात येते. 1917 साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ”पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी, अस्पृश्यांवर अन्याय करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या पत्राची गरज होती. आपली बाजू मांडण्यासाठी वृत्तपत्रासारखे प्रभावी साधन नाही, याची पुरेपूर जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. या जाणिवेतून ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा जन्म झाला. या पाक्षिकाला आता १०२ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचा दैनिक लोकमंथन आणि लोक news २४ चॅनलने घेतलेला हा धावता आढावा.
मराठी पत्रकारसृष्टीत समाजमन घडवण्यात आगरकर, टिळक, शि. म. परांजपे, दीनबंधुकार कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, रावबहाद्दूर लोखंडे, जागृतीकार भगवंतराव पाळेकर यांचे नाव घेतले जाते. या प्रत्येकाची पत्रकारिता विशिष्ट ध्येयाने भारीत झालेली होती.
मात्र मराठी पत्रकारितेचा इतिहास अभ्यासताना या मंडळींना लंघून चालणार नाही. किंबहुना मराठी पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा जिवंत ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान वादातीत आहे. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’, समता  या पत्रांच्या माध्यमांतून बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांत चैतन्य निर्माण करण्याचे काम केले. ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा जन्म झाला. ‘मूकनायक’ सुरू झाले त्यावेळी टिळक हयात होते. ‘मूकनायक’ची जाहिरात ‘केसरी’त छापण्यास नकार देण्यात आला. पण बाबासाहेब आंबेडकर यांनी नेटाने या पाक्षिकाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे हे पत्र काढण्यासाठी त्यांना राजर्श्री शाहू महाराज यांनी आर्थिक बळ पुरवले हे आपल्याला नाकारता येणार नाही.
बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ काढण्यापूर्वी ‘प्रार्थना समाजा’चे ‘सुबोधपत्रिका’, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ‘ज्ञानोदय’, हिंदुत्ववादी भोपटकरांचे ‘भाला’, ब्राह्मणेत्तरांचे ‘दीनमित्र’, ‘दीनबंधू’, ‘विजयी मराठा’, ‘जागृती’ ही पत्रे त्यांच्या वैविध्यांनी त्या त्या ज्ञातीत प्रसिद्ध होती. ‘इंदुप्रकाश’, ‘संदेश’ ही पत्रे महाराष्ट्रात आघाडीवर होती. असे असताना बाबासाहेब यांनी ‘मूकनायक’चा घाट का घातला, याचे उत्तर त्यांच्या पहिल्या अंकाच्या अग्रलेखात आहे.
‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येते की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना हितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.’
आपण एक पत्र का काढत आहोत, याची स्पष्ट भूमिका बाबासाहेब यांनी या अग्रलेखात मांडली आहे. याच अग्रलेखात ते,
‘अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये’.
अशा स्वरूपाची मांडणी करतात. ‘मूकनायक’ सुरू झाले तेव्हा त्याची किमत दीड आणा होती. वार्षिक वर्गणी अडीच रुपये होती. या अंकाचे प्रकाशक बाबासाहेब आंबेडकर होते तर संपादक पी. एन. भटकर व ज्ञानदेव घोलप होते. वृत्तपत्रीय शास्त्रानुसार अग्रलेख संपादकाने लिहावा, असा संकेत आहे. संपादकाने लिहिला नाहीतर संपादकीय मंडळातील कोणीही तो लिहावा. पण बाबासाहेब यांनी अंक सुरू झाल्यापासून ते विलायतेत उच्च शिक्षणाला जाण्यापूर्वी अग्रलेख, स्फूट लेख, लेख या पत्रात लिहिले होते. ‘मूकनायक’मध्ये बाबासाहेबांनी १४ लेख लिहिले. ५ जुलै १९२० रोजी ते परदेशात शिकायला गेले. ३ एप्रिल १९२३ मध्ये पुन्हा मायदेशात परतले. पण त्यांच्या पश्चात अनेक अडचणींचा सामना करून ‘मूकनायक’ अखेर बंद पडले. भारतात परतल्यावर बाबासाहेबांनी १९२४ सालापासून सार्वजनिक कार्यात सक्रीय सहभाग नोंदवला. त्यानंतर १९२७ मध्ये ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र जन्माला आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानत. ‘मूकनायक’च्या पहिल्या अग्रलेखाची जी लाइन आहे, त्याची मुळं फुले यांच्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथात पाहावयास मिळतात.
‘एकंदर सर्व भट वर्तमानपत्रकर्त्यांची आणि शूद्र व अतिशूद्रांची जन्मापातून एकदासुद्धा अशा कामी गाठ पडत नाही. त्यातून बहुतेक अतिशूद्रास तर वर्तमानपत्रे म्हणजे काय, कोल्हा का कुत्रा का माकड हे काहीच समजत नाही. तर मग अशा अनओळखी अतिशूद्रांची मते ह्या सवज्ञ सोवळ्या वर्तमानपत्रास कोठून व कशी कळणार’ (‘गुलामगिरी’ : म. फुले समग्र वाड.मय संपादक: कीर, मालाशे, पृ. १३९)
बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले ‘मूकनायक’ हे उपेक्षितांचे पहिले पत्र नाही. यासाठी आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेचा धांडोळा घ्यावा लागेल. गोपाळबाबा वलंगकर हे महाडजवळील रावढळ या गावाचे रहिवासी. लष्करातून ते १८८६ला निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी पत्रकारिता केली. त्यामुळे ते पहिले दलित पत्रकार ठरतात. त्यांनी ‘दीनबंधू’त दलित शोषणाविषयी भरपूर लिखाण केले आहे. धर्मशास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. २३ नोव्हेंबर १८८८ मध्ये त्यांनी ‘विचाळ-विध्वंसन’ नावाची पुस्तिका लिहिली. त्यांच्या लिखाणाची दखल ‘कास्ट, कॉन्फ्लिक्ट अ‍ॅण्ड आयडिओलॉजी’ या ग्रंथात रॅसलिण्ड ओहॅन्लॉनने (ओरिएंटल लाँगमन प्रकाशन, १९८५, पृष्ठ-२७१) घेतली आहे. दलितातील पहिले संपादक म्हणून शिवराम जानबा कांबळे यांचा उल्लेख करावा लागेल. १ जुलै १९०८ मध्ये जन्मलेल्या शिवराम कांबळे यांनी, ‘सोमवंशीय मित्र’ हे पहिले पत्र काढले. (यापूर्वी किसन फागू बनसोडे यांनी ‘मराठा दीनबंधू’ (१९०१), ‘अंत्यज विलाप’ (१९०६), ‘महारांचा सुधारक’ (१९०७) अशी तीन पत्रे काढली असे उल्लेख आहेत. पण ही पत्रे आता उपलब्ध नाहीत. ‘महारांचा सुधारक’ या पाक्षिक पत्राची जाहिरात ‘दीनबंधु’च्या २७ एप्रिल १९०७च्या अंकात झळकली होती. जाहिरात (पृष्ठ क्र. २२वर) त्यामुळे किसन फागू बनसोडे यांना दलितांचे पहिले संपादक म्हणून संबोधणे अप्रस्तुत ठरेल, असे गंगाधर पानतावणे आपल्या ‘पत्रकार आंबेडकर‘ या ग्रंथात नमूद करतात)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या चार पत्रांमागे काही प्रयोजन होते. त्यातील महत्तम प्रयोजन म्हणजे दलितांनी शिक्षण घ्यावे, पारंपरिक गावकीचे कामे टाकून सुशिक्षित बनावे. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय लिखाणात राजकीय, सामाजिक, धार्मिक, अर्थविषयक, शैक्षणिक, आरोग्य अशा विषयांचा समावेश होता. त्यांच्या राजकीय विचारांची चुणूक ‘मूकनायक’च्या अनेक अग्रलेखांतून येते. त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. लोकमान्य टिळक २ जानेवारी १९०७ रोजी कलकत्ता येथे एका भाषणाला गेले. तिथे त्यांनी, ‘स्वराज्य हे आमचे साध्य आहे, आमच्या राज्यकारभाराचा ताबा आम्हाला हवा आहे,’ असे भाषण केले. या भाषणावर टीका करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हे स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य!’ नावाचा अग्रलेख लिहिला. त्यातून त्यांनी टिळकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. महात्मा गांधी यांच्या स्वराज्य आंदोलनावरही बाबासाहेबांनी ‘मूकनायक’मध्ये टीका केली. नव्हे तर १६ जानेवारी १९९१९च्या टाइम्स ऑफ इंडियात एक लेख लिहून बाबासाहेबांनी स्वराज्यात अस्पृशांना काय स्थान असेल, असा सवाल केला आहे.
आपली बाजू मांडण्यासाठी वृत्तपत्रासारखे प्रभावी साधन नाही, याची पुरेपूर जाणीव बाबासाहेबांना होती. त्यामुळेच त्याकाळी बाबासाहेबांचे जहाल विचार न पटल्याने ‘काळ’, ‘नवयुग’, ‘प्रभात’, ‘कुलाबा समाचार’, ‘पुरूषार्थ’, ‘सकाळ’, ‘भाला’, ‘लोकमान्य’, ‘अग्रणी’, ‘केसरी’, ‘नवाकाळ’ यांनी त्यांच्यावर टीका केली. तर ‘ज्ञानप्रकाश’, ‘निर्भीड’, ‘विविधवृत्त’ आदी पत्रे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले.
बाबासाहेबांना ‘मूकनायक’मध्ये फारसे लिहिता आले नाही. पण ‘बहिष्कृत भारत’मध्ये त्यांची भाषा ओजस्वी आहे. शत्रूवर टीका करताना कमरेखाली वार न करता त्याला नामोहरम करण्यासाठी युक्तीवादाचे मोठेच हत्यार बाबासाहेबांनी वापरले होते. त्यांच्या भाषेत आंतरिक सौंदर्य तर होतेच शिवाय समाजातील उपेक्षित वर्गाचा कळवळा घेताना कधी कधी त्यांची लेखणी तलवारीसारखी तळपे. म्हणूनच की काय प्रसिद्ध विदुषी दुर्गा भागवत बाबासाहेबांच्या मराठी भाषेच्या फॅन होत्या. तसे त्यांनी आपल्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. प्रतिभा रानडे यांनी ‘एैसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे दुर्गाबाईंच्या मुलाखती घेऊन पुस्तक लिहिले आहे. त्यात दुर्गाबाईंनी बाबासाहेबांच्या मराठी लिखाणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. बाबासाहेबांचे लिखाण जड वाटते अशी पत्रे त्यांना प्राप्त झाल्याने ते सुबोध शैलीत लिहू लागले. त्यांच्या अग्रलेखात, लेखात एखाद्या कथेचा संदर्भ, दृष्टांतातून ते विरोधकांना नामोहरम करायचे. सूक्ष्म निरीक्षण आणि सत्यान्वेष, अर्थवाही शब्दरचना, अवतरण, वाक्प्रचार व म्हणी हेही बाबासाहेबांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. सुभाषित सदृश वाक्ये ही तर त्यांच्या लिखाणात ठायीठायी आढळतात. ‘भिक्षेने गुलामगिरी मिळते, स्वातंत्र्य नाही….’, ‘हिंसा अहिंसा ही केवळ आग्रहाच्या सिद्धीची साधने आहेत…’, ‘समता हे सार्वजनिक नितीचे एक तत्व आहे…’, ‘ हिंदू समाज म्हणजे अनेक भेदांची व पोटभेदांची उतरंड आहे…’ अशा सुभाषितवजा वाक्यांची पखरण त्यांच्या अग्रलेखात दिसते.
त्याच्या अग्रलेखाची शीर्षकेही समर्पक असतं. ‘देशद्रोही कोण?’, ‘माटे मास्तरांचा नवा शोध’, ‘दरोडेखोर धर्माभिमानी’, ‘नमस्कारातले ब्राह्मण्य’, ‘टिळकपरंपरेचे अंतरंग’, ‘अस्पृश्यांची पुंडाई की स्पृश्यांची गुंडाई’, ‘नकटा नकट्याला हसतो’, ‘शंकराचार्य की प्रतिसंकराचार्य’, ‘न्यायमूर्ति जातीवर गेले’, ही शीषर्क आजही लागू होण्यासारखीच आहेत. आज १०२ वा. मूकनायक दिन. त्यानिमित्त सर्व पत्रकारांना मूकनायक दिनाच्या शुभेच्या! या निमित्ताने आपण सर्व मूकनायकाचे वारसदार आहोत हे ठरवून सर्व वाटचाल करू.

COMMENTS