Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून मिशन मोडवर काम करावे : जलसंपदा मंत्री विखे

मुंबई दि. ११ :-  जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा  विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे

ज्यांनी जीवन घडविले तेच माझ्या लेखनाचे आदर्श : डॉ. बाबुराव उपाध्ये
डॉ. आंबेडकर यांचे पूर्णकृती स्मारक अनावरण समारंभासाठी आंबेडकर कुटुंबीयाला शासकीय आमंत्रण द्यावे 
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग: बदलाच्या विरोधात बैठक मुंबईत : आ. सत्यजीत तांबे

मुंबई दि. ११ :-  जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा  विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिल्या.

जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू उपस्थित होते. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर  अधिक भर दिला जावा. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने  जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा मध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. तसेच कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात यावे.

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या जागांची ७/१२ वर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीस्तरावर उपाययोजना राबविण्यात याव्यात. ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ मध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

COMMENTS