पारनेरला देणार मुळा धरणातून पाणी : उपमुख्यमंत्री पवारांची घोषणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरला देणार मुळा धरणातून पाणी : उपमुख्यमंत्री पवारांची घोषणा

अहमदनगर/प्रतिनिधी : मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अ

अपंग व्यक्तीला आधार देत दिवाळी केली गोड
स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील
शेतकरी दीपक आढावचा आत्महत्येचा प्रयत्न  

अहमदनगर/प्रतिनिधी : मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केली. मात्र, ही घोषणा करताना, या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे, असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याच्या जीर्णोद्धाराचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.
पारनेर शहराच्या पिण्याच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार लंके यांनी भाषणात केली होती. त्याची दखल घेत, मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून राबविण्यात येणार्‍या या योजनेसाठी पाणी आरक्षित करून निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवारांनी यावेळी केली. जिल्हाधिकार्‍यांमार्फत योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवा, येत्या तीन महिन्यात या योजनेचे काम कसे सुरू होईल याची काळजी मी घेतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पारनेर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसंबंधी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना पवार यांनी यावेळी संबंधितांना केली. श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. त्यामुळे संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना गृह मंत्री वळसे यांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले. महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी बोलताना, संत परंपरेत श्री निळोबारायांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे आणि सर्वजण समान असून आपापसात कोणताही भेदभाव नाही, ही शिकवण संत निळोबारायांनी दिल्याचे सांगितले. आ. लंके यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र पिंपळनेर येथील प्रस्तावित योजनांची माहिती दिली व पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले. यावेळी श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमास माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्ञानदेव पठारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, संचालक प्रशात गायकवाड, अशोक सावंत, बाबाजी तरटे, विक्रमसिंह कळमकर, अ‍ॅड. राहूल झावरे,संदीप चौधरी, पूनमताई मुंगसे, डॉ. कावरे, श्रीकांत चौरे, गोपाळबुवा मकाशीर, सुभाष गाजरे, अमोल पोटे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले उपस्थित होते.

नंबर वन आमदार…
करोना संकटात जगाला काही लोक माहिती झाले, त्यात तुमच्या पारनेरचाही आमदार आहे ! नीलेशच्या रुपाने तुम्हाला चांगले नेतृत्व मिळाले आहे. करोना काळात हा गडी रुग्णांमध्ये जाऊन ऐटीत बसत होता. त्यांना जेवण खाऊ घालीत होता. अगोदरच सामान्य प्रकृतीचा त्यात त्याला करोना झाला तर काय? असा प्रश्‍न मला पडायचा. मी दर शुक्रवारी पुण्यात आढावा बैठक घेत असे. त्यावेळी अनेक नागरीक तुमच्या पारनेरच्या आमदारासाठी मदत म्हणून माझ्याकडे धनादेश आणून देत होते. त्यामुळे त्याने केलेेले काम राज्यातील 288 आमदारांमध्ये एक नंबरचे ठरल्याचे गौरवोद्गार यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले. करोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्या, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले. तसेच करोना पुन्हा फोफावल्यावर पुन्हा लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. लग्नसराई सुरू झाली असून एकट्या महाराष्ट्रात 25 लाख विवाह आहेत. विवाहात गर्दी होणार आहे. तेथे करोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक घडी बिघडते. विकासकामे ठप्प होतात. रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे करोनाला गांभीर्याने घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

COMMENTS