22 जानेवारीपासून कडेकोट सुरक्षेत प्रचाराला सुरूवातढाका : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांची तयारी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, येत्या 22 जानेवा

22 जानेवारीपासून कडेकोट सुरक्षेत प्रचाराला सुरूवात
ढाका : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांची तयारी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, येत्या 22 जानेवारीपासून कडेकोट सुरक्षेत निवडणूक प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र, या निवडणूक प्रक्रियेत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला सहभागाची संधी मिळणार नसल्याचे अंतरिम सरकारने स्पष्ट केले आहे.
12 फेब्रुवारी रोजी होणार्या या संसदीय निवडणुका, ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अवामी लीग सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर घेण्यात येणार्या पहिल्याच निवडणुका ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, निवडणूक अधिकार्यांच्या निर्णयांविरोधातील अपील्सचा निकाल 10 ते 18 जानेवारीदरम्यान दिला जाणार आहे. 20 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, 21 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 22 जानेवारीपासून प्रचार सुरू होऊन 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत तो सुरू राहील. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 8 लाखांहून अधिक पीठासीन व सहाय्यक पीठासीन अधिकार्यांच्या प्रशिक्षणाला 22 जानेवारीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती निवडणूक प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक मुहम्मद हसनुज्जमान यांनी दिली. दरम्यान, अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी निवडणुकांबाबत ठाम भूमिका मांडत सांगितले की, निवडणुका ठरलेल्या दिवशीच होतील. कोणत्याही परिस्थितीत मतदानाची तारीख बदलली जाणार नाही. 12 फेब्रुवारीलाच निवडणुका होतील – ना एक दिवस आधी, ना एक दिवस नंतर, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मतदान प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष, शांततापूर्ण आणि लोकशाही उत्सवाच्या वातावरणात पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही भूमिका त्यांनी त्या वेळी मांडली, जेव्हा अमेरिकेचे माजी वरिष्ठ राजनयिक अल्बर्ट गॉम्बिस आणि मॉर्स टॅन यांनी मंगळवारी रात्री ढाक्यातील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये त्यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान अंतरिम सरकार निवडणूक काळात पूर्णपणे तटस्थ राहील आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी दिली जाईल, असे युनूस यांनी स्पष्ट केले.

COMMENTS