महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत सर्वाधिक जाणते ने
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत सर्वाधिक जाणते नेते म्हणून, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या बाजूने नेतृत्व करत असतानाही, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यावर नगर जिल्ह्यातील नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोचरी टीका करत म्हटले आहे की, जाणता राजा असलेल्या शरद पवार यांनी अनेकांचे वाटोळे केले आहे; आता, त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. शरद पवार यांचे राजकारण महाराष्ट्रामध्ये १९६२ पासून सुरू झाले; तर, आजतागायत ते अव्याहतपणे राजकारणात आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणाला १९६७ मध्ये प्रारंभ झाला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांचे नाव प्रथमच बारामती मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. पहिल्या निवडणुकीतच विजयी झालेले शरद पवार यांनी मात्र, पक्षाच्या शिस्तीत राहण्यापेक्षा वेळोवळी पक्ष बदल आणि सत्ता आली की, काँग्रेस प्रवेश, अशा पद्धतीचे राजकारण सातत्याने केलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला; त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसलाही कधी बहुमत मिळाले नाही. त्यांनी ज्या ज्या वेळी विरोधी पक्षाचे नेतृत्व केलं, त्यावेळीही त्यांना कधीही बहुमत मिळाले नाही. त्यांनी १९९९ मध्ये स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, गेल्या २५ वर्षांपैकी साडेसतरा वर्षे सत्तेत राहूनही त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे जाता आले नाही. हाच आरोप करत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता. पक्षामध्ये काम करणारे कर्तबगार नेते असतानाही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि मुख्यमंत्री पदही मिळाले नाही; असा आरोप करत त्यांनी पक्ष सोडला होता. अर्थात, शरद पवार यांनी स्थापन केलेला मूळ पक्ष आता अजित पवार यांच्याकडेच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सामाजिक प्रश्न देखील शरद पवार यांच्या नेतृत्वाने निर्माण केले. त्यामध्ये नामांतराची चळवळ हा जो प्रश्न होता, तो प्रामुख्याने त्यांनीच निर्माण केलेला होता. त्यांनीच तो सोडवला ही होता, असं आजही म्हटलं जातं. परंतु, या प्रश्नावर अठरा वर्ष महाराष्ट्रात संघर्ष झाला. शरद पवार लोकसभेचे नेतृत्व करताना महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले; परंतु, त्या यशावर ते एवढे दिपून गेले की, त्यांनी विधानसभा निवडणूकीचे सूक्ष्म पद्धतीने नियोजन करायला हवं होतं, ते त्यांच्याकडून झालं नाही. त्याचा परिणाम त्यांच्या पराभवात झालेला आहे. अर्थात, ते सत्तेत जरी आले असते तरी त्यांची सत्ता देखील अदानी यांच्या मित्राची सत्ता राहिली असती, असं खाजगीत आताही बोललं जातं. अर्थात, विखे पाटील यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे, ते पाहता शरद पवार हे सहजासहजी हार मानतील अशातील हे व्यक्तिमत्व निश्चित नाही. येत्या १२ डिसेंबरला त्यांच्या वयाला ८४ वर्षे पूर्ण होतील. सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. परंतु, राजकारण करताना त्यांच्यातील द्वेष आजही तेवढाच जोशपूर्ण आहे. शरद पवार हे संघटक नेते मानले जात असले तरी, त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय बाबी अशा केल्या आहेत की, त्यांच्याकडे आज राजकीय क्षेत्रामध्ये विश्वासहार्य नेतृत्व म्हणून कोणीही पाहत नाही. कारण अनेकांना त्यांनी ज्या पद्धतीने धोके दिले आहेत, ते पाहता त्यांच्या राजकारणाच्या संदर्भात विश्वासू राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे आता महाराष्ट्र पाहत नाही. अनेक राजकीय नेत्यांना त्यांनी संधीही दिली आहे आणि संधीही नाकारली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटूंबाची आणि पवार साहेबांचे परंपरागत मतभेद आजही कटू आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
COMMENTS