पुणे ः बारामती मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँगे्रस लढण्यास इच्छूक असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्त्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार अ
पुणे ः बारामती मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँगे्रस लढण्यास इच्छूक असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्त्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेविरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता असतांना, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची बुधवारी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे अजित पवारांच्या गटातील अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
अगदी दोन दिवसापूर्वीच एका महिला मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पवारांना बारामतीतून पाडा, अशा आशयाचे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले होते. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज द्यावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले होते. याबाबत शिंदे गटाने विजय शिवतारे यांना समज देखील दिली होती. मात्र, तरी देखील शिवतारे बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम होते. दरम्यान, शिवतारे यांनी बुधवारी (ता.3) सासवडमध्ये तातडीने आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत विजय शिवतारे यांना बारामतीतून अपक्ष उभे करण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी संवाद साधला. अजित पवार महायुतीत आल्यानंतर मी त्यांना भेटलो होतो. त्यांचा सत्कार करून अभिनंदन देखील केले. मात्र, अजित पवार यांचा उर्मटपणा कमी झालेला नाही. त्यामुळे मी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवतारे म्हणाले. बारामतीत पवार यांच्याविरोधात साडे पाच लाख मतदार आहेत. त्यांना कोणत्याच पवारांना मतदान करायचे नाही, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. पवार कुटुंबाला पर्याय म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना माझा पर्याय असेल. विजय शिवतारे यांना एक मत, म्हणजे दोन्ही पवारांना एकदाच पाडण्याची संधी, असा नाराही विजय शिवतारेंनी दिला आहे. दरम्यान, विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मात्र, महायुतीत राहून आमच्याच वरिष्ठ नेत्यांवर टीका करणे आम्ही खपवून घेणार नाही, अशा इशाराही मिटकरींनी दिला आहे.
पवार विरूद्ध सर्वसामान्य माणूस – पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक असेल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढले पाहिजे असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. याशिवाय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना लोकं मते देऊ इच्छित नाहीत असेही शिवतारे म्हणाले. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
COMMENTS