Homeताज्या बातम्यासंपादकीय

हलगर्जीपणाचे बळी

कोरोनासारख्या गंभीर साथीच्या काळात महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थेने चोख भूमिका निभावली होती. कोरोनामुळे आरोग्ययंत्रणा भक्कम असायला हवी, यासाठी आरोग

हवामान बदलाचे संकट
जुन्या पेन्शनचा नवा शंखनाद
नबावावरून बेबनाव

कोरोनासारख्या गंभीर साथीच्या काळात महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थेने चोख भूमिका निभावली होती. कोरोनामुळे आरोग्ययंत्रणा भक्कम असायला हवी, यासाठी आरोग्यविभागामध्ये मोठी भरती करण्यात आली, त्याचबरोबर आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणावर निधी पुरवून, तेथील सोयी-सुविधा सक्षम करण्यावर राज्य सरकारने जोर दिला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी ठाणे येथील मनपाच्या रूग्णालयात 24 तासांमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील चौकशीचा अहवाल समोर येवून दोषींवर कारवाई होण्यापूर्वीच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात काही तासांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा वार्‍यावर सोडल्याचेच दिसून येत आहे. शिवाय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ठाण्यातील घटनेपासून बोध घेतला नसल्याचेच समोर येत आहे. दुर्घटना या घडत असतात, मात्र त्यातून बोध घेवून, भविष्यात त्या होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळे ठाण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्वंच शासकीय रुग्णालयांची झाडाझडती घेण्याची गरज होती, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नांदेड येथे दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. त्या जीवांचा हक-नाक बळी गेल्याचे दिसून येत आहे. सरकारने गाजावाजा करत, शासकीय रुग्णांलयांमध्ये मोफत उपचार देण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक गरजू, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, असेच रुग्ण या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेण्यासाठी जातात. मात्र अशा रुग्णांना रुग्णालयांकडून बाहेरून औषधी आणण्यास सांगितल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांतील रुग्णांचा जीव रामभरोसे सोडून देत असल्याचेच समोर आले आहे. खरंतर आजचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालेले आहे. त्यामुळे रुग्णालय म्हणले मंदिर आणि डॉक्टर म्हणजे देवदूतच समजला जातो. मात्र आजमितीस रूग्णालये मृत्यूचे दवाखाने बनतांना दिसून येत आहे. येथील रुग्णांशी काही घेणे-देणे नसल्याचा येथील डॉक्टरांचा अविर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किड्या-मुंग्यांसारखे जीव मरत असतांना, त्यांना वाचवण्यासाठी कुणीही शर्थीचे प्रयत्न करू शकलेले नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. याप्रकरणाची चौकशी होईलच यात शंका नाही, मात्र पुन्हा एकदा मुख्य आरोपींना पाठीशी घातले जाईल, आणि थातुर-मातूर कारवाई करून, काही डॉक्टरांना निलंबित केले जाईल. मात्र नांदेडच्या रुग्णालयांचा औषधांचा पुरवठा वेळेवर होत नसल्याचे समोर आले आहे. नांदेडच्या रुग्णालयात विविध आजारांमुळे गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या औषधांचा तुटवडा असल्याचे काही कर्मचार्‍यांनी खासगीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. शिवाय वैद्यकीय अधीक्षकांनीही ते मान्य केले आहे. रक्ताच्या चाचण्या व बहुतांशी औषधी बाहेरून आणावी लागत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्‍न आता निर्माण होतांना दिसून येत आहे. नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात 500 खाटांची व्यवस्था आहे. पण नांदेडसह शेजारील जिल्ह्यातून 1200 पेक्षा अधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. नेहमीच रुग्णांची येथे गर्दी असते. रुग्णांच्या तुलनेत उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्सेसह इतर स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे अशा वेळी सरकारने वेळीच पावले उचलण्याची खरी गरज होती. या रुग्णालयात रुग्ण कुठून येतात, मग त्यांच्यासाठी त्या तालुक्यात, त्याठिकाणी उपजिल्हा रूग्णालयाची व्यवस्था करता आली असती, त्याचबरोबर याठिकाणी रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे याठिकाणी औषधांचा मुबलक साठा, डॉक्टरांची, नर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवता आली असती, मात्र सरकार सध्या सत्तेच्या द्वंदामध्ये मग्न असल्यामुळे त्यांना रुग्णांची काळजी असल्यासारखे तरी आजमितीस दिसून येत नाही. त्यामुळे ठाणेे, नांदेडनंतर आणखी तिसरी घटना घडण्यापूर्वी राज्य सरकारने झोपेतून जागे होण्याची गरज असून, आरोग्य विभागाची झाडाझडती घेण्याची खरी गरज आहे.  

COMMENTS