Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उडदावणे होणार आता मधाचे गाव !शासनाकडून निवड ; ४५ लाखांचा निधी मंजूर

अकोले : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 'मधाचे गाव' ही योजना सुरू केली. राज्यात पहिल्या टप्प्यात दहा गावांची निवड करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल

महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयात महिला दिन उत्साहात

अकोले : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. राज्यात पहिल्या टप्प्यात दहा गावांची निवड करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी अकोले तालुक्यातील उडदावणे गावाचा समावेश केला आहे. या गावाला ४५ लाखांचा निधी मंजूर झाला असून २५ लाभार्थ्यांना मधुमक्षिका पालन पेटीचे वाटप करण्यात आले.

 राज्य कृषी विभागाने २०२४ मध्ये मध पालन व परागसिंचन विकास या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ‘किमान एक गाव मधाचे’ म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला.अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी अकोले तालुक्यातील पर्यटक स्थळ असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील निसर्गाच्या कुशीत वसलेले उडदावणे गावाची निवड करण्यात आली आहे. यासाठी ४५लाख रुपये निधी मंजूर झाला.  यामुळे जिल्ह्यात उडदवणे हे मधाचे गाव निर्माण होणार आहे. तसेच, यातून स्थानिक नागरिकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने उडदवणे गावात मध निर्मितीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. स्थानिकांना मधमाशांच्या जतन करण्यापासून ते मध गोळा करण्याच्या प्रक्रियापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सचिव रवींद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, कळसुबाई अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, अहिल्यानगर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, वनपाल शंकर लांडे, कृषी अधिकारी विकास चौरे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक कुंदन कोरडे, ग्रामोद्योग संघाच्या तालुकाध्यक्ष मंगल शेलार, छाया वाकुंज, उषा सोनवणे, सरपंच कीर्ती गिन्हे आदीच्या प्रमुख उपस्थितीत २५ स्थानिकांना मधुमक्षिका पेटी वितरीत करण्यात आल्या.

भंडारदरा पर्यटनावर आलेल्या पर्यटकांना निसर्गाचे सोने म्हणून प्रसिद्ध असलेला मध घेण्यासाठी आकर्षित करण्याची गरज आहे. उडदवणे गावातून मधाचे उत्पन्न निघाल्यास सर्व मध खादी ग्रामोद्योग मंडळ विकत घेऊन उडदावणे गावचा आर्थिक स्रोत वाढविण्यास बांधील राहणार आहे. -नित्यानंद पाटील,  उपमुख्य कार्यकारी, खादी ग्रामोद्योग.

जर मधमाशी टिकली तरच निसर्गचक्र हे सुरू राहणार आहे. मधमाशांचा निसर्गाशी समतोला राहावा यासाठी मधमाशी संगोपन होण्याची गरज आहे. संगोपनासाठी बँकांचेही सहकार्य होत आहे. एकजुटीने गाव उभा राहिला तर निश्चितच उडदावणे गाव हे मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. यासाठी गावातील महिला व तरुणांनी पुढे येऊन गावाची ओळख महाराष्ट्राच्या नकाशावर पोहोचवावी. – रवींद्र साठे, सचिव, खादी ग्रामोद्योग मंडळ.

COMMENTS